काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाच्या हालचाली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:37 AM2017-07-20T00:37:11+5:302017-07-20T00:37:11+5:30
प्रदेशाध्यक्षांकडे पुन्हा मागणी : जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुक
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: केंद्र व राज्यातील सत्ता गमावल्यानंतर काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ला. त्यामुळे पक्षाच्या कार्यकारिणीत बदल करून महानगर व जिल्हा काँग्रेस बरखास्त करून नव्याने पदाधिकारी नियुक्त करावे, ही मागणी अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या वर्तुळात आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षांतर्गत निवडणुकीचा कार्यक्रमही १५ मेपासून सुरू झाला असून, आॅगस्ट अखेरपर्यंत जिल्हाध्यक्ष व महानगर अध्यक्षांची निवड होणे अपेक्षित असल्याने काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत.
पक्षांतर्गत निवडणुकीसाठी काँग्रेसने सदस्य नोंदणी मोहीम पूर्ण करून प्रदेश काँग्रेसला सूचित केले आहे. यादरम्यानच, औरंगाबाद ग्रामीणच्या जिल्हाध्यक्ष पदावर अब्दुल सत्तार तसेच यवतमाळ येथे डॉ. वजाहत मिर्झा यांनाही जबाबदारी देण्यात आल्याने अकोल्यातही फेरबदल करावे, या मागणीने उचल खाल्ली असून, आठ दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची काही नेत्यांनी भेट घेऊन नेतृत्व बदलाची मागणी पुन्हा एकदा रेटून धरल्याची माहिती आहे. अकोल्यात काँग्रेसची महापालिका व नगरपालिका निवडणुकीत कामगिरी सुमार राहिली. निवडणुकीपूर्वीच काही नगरसेवकांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. यादरम्यान, महानगर अध्यक्ष माजी आ. बबनराव चौधरी यांच्याविरोधात काँग्रेसची दुसरी फळी जाहीरपणे विरोधात उभी ठाकली होती. काँग्रेसमधील हा असंतोष अजूनही कायमच आहे.
त्यामुळे पक्षांतर्गत निवडणुका झाल्याच तर चौधरी यांच्यावर मात करण्यासाठी या फळीने तयारी सुरू केली आहे.
प्रदेश स्तरावर झालेल्या बैठकीत महानगर अध्यक्ष चौधरी यांच्याविरोधात जुन्याच तक्रारी नव्याने सांगण्यात आल्या असून, त्यामध्ये स्वराज्य भवनाचे भाडे याचाही समावेश असल्याची माहिती आहे. यापूर्वी प्रदेशाध्यक्षांनी अशा तक्रारींची दखल घेतली नव्हती. यावेळी मात्र त्यांनी पदाधिकाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
पक्षांतर्गत निवडणुकीवर प्रश्नचिन्ह
१५ मेपासून सुरू झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकीसाठी इच्छुकांनी सदस्य नोंदणी करून निवडणूक लढविण्याची तयारी केली असून, महानगरासाठी निवडणूक घेण्यात यावी, असा काही पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे, तर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदासाठी बूथनिहाय नोंदणीचा टक्का कमी असल्याने निवडणुकीची शक्यता कमीच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्हाध्यक्ष पदासाठी स्पर्धा
अकोला महानगर अध्यक्ष पदासोबतच जिल्हाध्यक्ष पदासाठीही पक्षात स्पर्धा आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांना एक्सटेन्शन देण्याऐवजी नव्या नेतृत्वाच्या हातात पक्ष देण्याबाबत प्रदेश बैठकीत पदाधिकाऱ्यांनी आग्रह धरला असून, जिल्हाध्यक्ष पदासाठी प्रकाश तायडे, डॉ. सुधीर ढोणे यांच्यासह बाबाराव विखे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘डीआरओ’ म्हणून बिहारचे आमदार
अकोला जिल्हा व महानगर अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बिहारचे काँग्रेस आमदार राजेशकुमार यांची नियुक्ती पक्षाने केली आहे. पुढील पंधरवड्यात त्यांचा दौरा अपेक्षित असून, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पुढील अध्यक्षाचे नाव निवडल्या जाणार आहे.