वेतनाच्या मागणीसाठी मनपा कर्मचा-यांचे आंदोलन
By admin | Published: June 4, 2016 02:22 AM2016-06-04T02:22:20+5:302016-06-04T02:22:20+5:30
चार महिन्यांचे वेतन थकीत; लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानासमोर ‘थाळी वाजवा’आंदोलन.
अकोला: चार महिन्यांचे वेतन थकीत असल्यामुळे कुटुंबाचा गाडा कसा हाकावा, या विवंचनेत असलेल्या महापालिका कर्मचारी संघर्ष समितीने शुक्रवारी लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानासमोर जाऊन ह्यथाळी वाजवाह्ण आंदोलन केले. वेतनावर तातडीने तोडगा न काढल्यास अत्यावश्यक सेवा बंद करण्याचा सज्जड इशारा संघर्ष समितीने दिला.
राज्य शासनाने एलबीटी रद्द केल्यामुळे मनपाच्या प्रमुख उत्पन्नाचा मार्ग बंद पडला. एलबीटीच्या बदल्यात मनपाला महिन्याकाठी ४ कोटी २२ लाख रुपये देणे अपेक्षित असताना शासनाने एलबीटीच्या अनुदानात कपात करण्याचे धोरण स्वीकारले. याचा परिणाम कर्मचार्यांच्या वेतनावर होऊन थकीत वेतनाची समस्या पुन्हा निर्माण झाली. वेतनाचा तिढा निकाली निघत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेत, मनपा कर्मचारी संघर्ष समितीने २५ मेपासून संप पुकारला.
संपाला दहा दिवस होत असताना तोडगा निघत नसल्याचे पाहून शुक्रवारी संघर्ष समितीने लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानासमोर ह्यथाळी वाजवाह्ण आंदोलन छेडले. सर्वप्रथम आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निवासस्थानासमोर जाऊन त्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर खा. संजय धोत्रे, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. रणधीर सावरकर आणि पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी संघर्ष समितीचे अध्यक्ष पी.बी. भातकुले, कार्याध्यक्ष अनिल बिडवे, सचिव विठ्ठल देवकते, उपाध्यक्ष कैलास पुंडे, अनुप खरारे, विजय पारतवार, शांताराम निंधाने, विजय सारवान, रवींद्र शिरसाट, नंदकिशोर उजवणे, जी.आर. खान, ओम ताडम, महादेव शिरसाट, प्रकाश घोगलीया, पी.व्ही. पाटील, अजीज सर, वसंत पवार, एस.एल.चवने, किशोर सोनटक्के, धनराज सत्याल, संजय पाटील, गजानन ढगे, संजय कथले, अशोक सोळंके, हेमंत शेळवणे, महादेवराव पाटील, राजेश साळुंखे, बबलू सारवान, प्रवीण भालेराव, श्याम गाढे, नीलेश घावरे, सुनील इंगळे, यशवंत दुधांडे, प्रताप झांझोटे आदींसह असंख्य कर्मचारी उपस्थित होते.