जलसंधारणाची चळवळ गतिमान व्हावी!

By admin | Published: April 21, 2017 01:59 AM2017-04-21T01:59:16+5:302017-04-21T01:59:16+5:30

वॉटर कप स्पर्धा : राबणाऱ्या हातांना आणखी पाठबळाची गरज !

Movement of water conservation should be increased! | जलसंधारणाची चळवळ गतिमान व्हावी!

जलसंधारणाची चळवळ गतिमान व्हावी!

Next

अकोला : वॉटर कप स्पर्धेसाठी अकोल्यातील तीन तालुक्यांच्या १०५ गावांमध्ये सध्या जलसंधारणासाठी श्रमदानाने वेग घेतला आहे. तब्बल दहा हजारांवर नागरिक श्रमदान करीत आहेत. मुळातच वॉटर कप ही स्पर्धा आपल्या गावातील पाण्याची व्यवस्था आपणच निर्माण करावी, या उद्देशाने आहे. लोकवर्गणी व श्रमदान हे या स्पर्धेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे, त्यामुळे १०५ गावांमधून नागरिक मोठ्या संख्येने कामाला लागले आहेत. या नागरिकांना आता शहरी भागातील स्वयंसेवी संस्थांच्या मदतीसह नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागाची जोड मिळाली, तर जलसंधारणाची ही चळवळ अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा गुरुवारी लोकमत कार्यालयात घेण्यात आलेल्या परिचर्चेत व्यक्त करण्यात आली.
वॉटर कप स्पर्धेच्या अनुषंगाने सध्या या तीन तालुक्यांमध्ये निर्माण झालेले वातावरण, लोकांचा प्रतिसाद व अडचणी यासंदर्भात आयोजित परिचर्चेत वॉटर कपचे तालुका समन्वयक, ग्रामस्थ व अधिकारी सहभागी झाले होते.
जलसंधारणाच्या या चळवळीमुळे गावागावांत मनसंधारणही होत असल्याचे प्रत्यंतर या चर्चेत समोर आले.
पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून ही स्पर्धा सुरू असून, यासाठी कुठल्याही स्वरूपाचे अनुदान नाही; मात्र काही नकारात्मक प्रवृत्ती अशा अनुदानाची अफवा पसरवून ग्रामस्थांना भ्रमित करण्याचे काम करीत असल्याची हतबलता अनेकांनी व्यक्त केली. आपल्या गावात पडणारे पाणी आपणच मुरवायचे, हे मूळ ध्येय या स्पर्धेचे आहे. जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व प्रशासन प्रत्यक्ष श्रमदानामध्ये सहभागी होत आहे, ग्रामस्थांना प्रोत्साहन देत आहे, त्यामुळे आगामी काळात यामध्ये स्वयंसेवी संस्थांनीही पुढाकार घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांनी उत्तम कामगिरी बजावल्यास या गावांपैकी जी गावे जलयुक्त शिवार योजनेत सहभागी नाहीत, त्या गावांचा समावेश या योजनेत करण्याचे आश्वासन दिले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने श्रमदानासाठी नागरिक मोठ्या संख्येने पुढे येत आहेत, ही चांगली बाब आहे; परंतु या स्पर्धेसाठी श्रमदान हा एक निकष आहे. असे अनेक निकष स्पर्धेत पात्र होण्यासाठी आहेत. त्यामध्ये यंत्राद्वारे काम हासुद्धा एक निकष आहे. यासाठी ग्रामस्थ लोकवर्गणी करून निधी उभारत आहेत. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांनी पुढे आल्यास या चळवळीला मोठा हातभार लागेल.
- प्रा. संजय खडसे, उपविभागीय अधिकारी, बाळापूर.

पाणी फाउंडेशनचे काम सुरू झाल्यानंतर काही गावांमध्ये आधी नकारात्मक प्रतिक्रिया होती. त्यानंतर मात्र कामांना प्रारंभ झाला आहे. जळगाव नहाटे येथे केवळ एका युवकाने सुरू केलेल्या कामाला आज दररोज ५० ते १०० लोक पुढे नेत आहेत. आसेगाव बाजार, लामकाणी येथे गावांचे मतपरिवर्तन झाले आहे. जलसंधारणाच्या कामांबाबत शासनाकडून पारदर्शकता यायला पाहिजे. लघुसिंचन विभाग आणि पाटबंधारे विभाग यांच्यामध्ये समन्वय हवा. उमरा गावात लोकांना श्रमदानाकडे वळविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.शहरातील लोकांनी दोन हात आणि दोन तास देण्याची गरज आहे.
- नरेंद्र काकड, अकोट तालुका समन्वयक, पाणी फाउंडेशन.

उमरा गावाने वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत गावातील पुरुषांपेक्षा महिलांचा लक्षणीय सहभाग आहे. प्रशिक्षण करून आल्यानंतर ग्रामस्थांकडे दोन तास श्रमदान करण्याचा जोगवा मागितला. अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनकडून सध्या कामांसाठी कुठलाही पैसा आलेला नाही. गावांनी लोकसहभागातून चांगली कामे केल्यानंतर जे गाव चांगली कामगिरी करेल, त्या गावांना पाणी फाउंडेशन पुरस्कृत करणार आहे. गावातील युवकांनीही श्रमदानात सहभाग घेण्याची गरज आहे. गावात जलजागृती सुरू केली आहे.
- मंजूषा सचिन इंगळे, उमरा, अकोट.

वॉटर कप स्पर्धेतून जलजागृती होत आहे. या स्पर्धेसाठी घेण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात युवकांना पाण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे. या स्पर्धेतून श्रमदानातून जलसंधारणाची चळवळ उभी राहत आहे. महामाग मारखेड येथे ग्रामस्थांनी ७ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता कामाला सुरुवात केली. त्यावरून लोकांमध्ये किती उत्साह आहे, याची कल्पना येते. या स्पर्धेसाठी महसूल विभाग, एसटी महामंडळ व जिल्हा प्रशासन यांचे चांगले सहकार्य मिळत आहे. बार्शीटाकळी तालुक्यात कान्हेरी सरप येथे हेवेदावे विसरून ग्रामस्थ श्रमदान करीत आहेत. हीच परिस्थिती तालुक्यातील इतर गावांमध्ये आहे.
- संघपाल वाहुरवाघ, बार्शीटाकळी तालुका समन्वय, पाणी फाउंडेशन.

पातूर तालुक्यात काही गावांमध्ये दोन लोकांनी श्रमदानाच्या कामास सुरुवात केली. या गावांमध्ये जनजागृती होऊन आज तेथे १७५ लोक दररोज श्रमदान करतात. तालुक्यातील शिर्ला, बेलुरा बु., चारमोळी आदींसह अनेक गावे आघाडी घेत आहेत.शासनाने वाटर कपच्या कामात सहकार्य करण्यासाठी कामाचे नियोजन करण्याची अपेक्षा आहे. तालुक्यातील अनेक गावांतील ग्रामसेवक अजूनही पाहिजे त्या प्रमाणात सहभागी झालेले नाहीत. त्यांनी मनापासून सहभाग घेण्याची गरज आहे. तसेच ज्या गावांमध्ये श्रमदानाच्या मोहिमेचा वेग मंदावला, तेथे तो वाढण्याची गरज आहे.
- प्रफुल्ल कोल्हे, पातूर तालुका समन्वयक, पाणी फाउंडेशन.

बार्शीटाकळी तालुक्यात वॉटर कप स्पर्धा राबवत असताना लोकसहभाग मिळेल किंवा नाही, याविषयी साशंकता होती; मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर श्रमदानासाठी उत्स्फूर्त लोकसहभाग मिळत आहे. कान्हेरी सरप येथे १०० मीटर सीसीटी, १५० शोषखड्डे, २०० मीटर नाल्यातील गाळ काढण्यात आला. अशीच कामे तालुक्यातील इतर गावांमध्ये सुरू आहेत. प्रशिक्षणादरम्यान अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यांचे उत्तर तेथेचे शोधण्यात आली. गावे पाणीदार करण्यासाठी लोकांचा चांगला सहभाग मिळत आहे.
- समाधान वानखडे, तालुका समन्वयक

Web Title: Movement of water conservation should be increased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.