अमरावतीहून किसान रेल्वे सुरू करण्यासाठी हालचाली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 12:08 PM2020-08-29T12:08:06+5:302020-08-29T12:08:28+5:30
अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यांनाही किसान विशेष रेल्वेचा लाभ व्हावा, याकरिता पश्चिम विकास समिती सरसावली आहे.
अकोला : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालास जलद गतीने परराज्यात विक्रीसाठी पाठविता यावे, या उद्देशाने देशातील पहिली किसान विशेष रेल्वे नाशिक येथून सुरू झाल्यानंतर, आता अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यांनाही या रेल्वेचा लाभ व्हावा, याकरिता पश्चिम विकास समिती सरसावली आहे. अमरावती येथून किसान रेल्वे सुरू करावी, या मागणीसाठी पश्चिम विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन रेल्वे सुरू करण्यामागची भूमिका विषद केल्याची माहिती अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी शुक्रवारी येथील पत्रकार परिषदेत दिली.
अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये संत्री, केळी, सीताफळ, पपई या फळांसह कापूस, हरभरा, सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. याशिवाय गोड पाण्यातील मासे, दूध, पालेभाज्या, रानभाज्या, पान या नाशवंत मालांचेही मोठे उत्पादन होते. शेतकºयांनी उत्पादित केलेल्या या मालाची वाहतूक जलद गतीने बाजारपेठेपर्यंत व्हावी, यासाठी विभागातून किसान रेल्वे सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे. सुलभ व स्वस्त वाहतुकीची सुविधा नसल्यामुळे शेतकरी नाशवंत मालाचे उत्पादन करण्यास धजावत नाहीत. रेल्वेद्वारे वाहतुकीची सुविधा उपलब्ध झाल्यास शेतकरी मोठ्या प्रमाणात या मालाचे उत्पादन घेतील. पर्यायाने पश्चिम विदर्भातील शेतकºयांचे जीवनमान उंचावेल, यासाठी अमरावती विभागाचे मुख्यालय असलेल्या अमरावती येथून किसान रेल्वे सुरू करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली असता, त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन रेल्वेराज्यमंत्री हरसिमरत कौर बादल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली, असे दिनेश सूर्यवंशी यांनी सांगितले. गडकरी यांच्या निर्देशानुसार ही रेल्वे सुरू करण्यासाठी अमरावती विभागातील सर्व संबंधित घटकांसोबत चर्चा करण्याच्या उद्देशाने विदर्भ विकास समितीचे पदाधिकारी पाचही जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. सर्व काही सुरळीत झाले, तर आगामी प्रजासत्ताकदिनी अमरावती येथून किसान रेल्वे सुरू होईल, अशी आशा सूर्यवंशी यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेला समितीचे संयोजक नितीन भुतडा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.