अकोला जिल्ह्यातील ३३ शाळांमध्ये फिरणार फिरती प्रयोगशाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 12:27 PM2019-11-29T12:27:25+5:302019-11-29T12:27:35+5:30
विद्यार्थ्यांसाठी विज्ञान विषय सोपा होण्यास मदत व्हावी आणि विज्ञानामध्ये आवड निर्माण व्हावी, हाच फिरत्या प्रयोगशाळेचा उद्देश आहे.
अकोला: राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, भारत सरकारद्वारा रामन विज्ञान केंद्राची फिरती प्रयोगशाळा शुक्रवारी अकोल्यात दाखल होणार असून, ही फिरती प्रयोगशाळा ३३ शाळांमध्ये फिरणार आहे. तब्बल अडीच महिने प्रयोगशाळा अकोल्यात मुक्कामाला थांबणार आहे. विज्ञानाचा प्रचार व प्रसार हा विद्यार्थ्यांमध्ये व्हावा आणि शालेय पाठ्यपुस्तकातील विज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी फिरत्या प्रयोगशाळेचा उपयोग होणार आहे.
शालेय पाठ्यपुस्तकातील संकल्पना घेऊन दृकश्राव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक पद्धतीने विषय फिरत्या प्रयोगशाळेत मांडण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांसाठी विज्ञान विषय सोपा होण्यास मदत व्हावी आणि विज्ञानामध्ये आवड निर्माण व्हावी, हाच फिरत्या प्रयोगशाळेचा उद्देश आहे. जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना फिरत्या प्रयोगशाळेचा लाभ घेता यावा, यासाठी ही फिरती प्रयोगशाळा निवडक शाळांमध्ये जाणार आहे. या शाळांमध्ये प्रत्येकी दोन दिवस ही प्रयोगशाळा थांबणार आहे. रामन विज्ञान केंद्राने ही फिरती प्रयोगशाळा उभारली असून, या प्रयोगशाळेमध्ये शालेय पाठ्यपुस्तकातील विज्ञान विषयावर आधारित प्रयोग, विज्ञान प्रतिकृती आहेत. विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी या प्रयोगशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी रामन विज्ञान केंद्र नागपूरचे अभिमन्यू भेलावे, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग, उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे, देवेंद्र अवचार, विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र भास्कर, अनिल जोशी, विश्वास जढाळ, मुरलीधर थोरात, सुनील वावगे, मनीष निखाडे, विलास घुंगड, संतोष जाधव, देवानंद मुसळे, ओरा चक्रे, पी. पी. चव्हाण व किरण देशमुख यांनी केले आहे.
या शाळांमध्ये जाणार फिरती प्रयोगशाळा
२९ नोव्हेंबर ते १३ फेब्रुवारीपर्यंत ही प्रयोगशाळा जिल्ह्यातील शाळांमध्ये फिरणार आहे. यात जय भवानी विद्यालय निपाणा, तुकाराम इंगोले विद्यालय कानशिवणी, जय बजरंग विद्यालय कुंभारी, ज्युबिली इंग्लिश हायस्कूल, स्वावलंबी विद्यालय, आदर्श विद्यालय, भिकमचंद खंडेलवाल विद्यालय, शिवाजी विद्यालय गोरेगाव, सार्वजनिक विद्यालय चोहोट्टा बाजार, राधाबाई गणगणे विद्यालय मुंडगाव, लक्ष्मीबाई गणगणे विद्यालय अकोट, राजीव गांधी विद्यालय मुंडगाव, अंबिका विद्यालय सौंदळा, बाबासाहेब खोटरे विद्यालय सिरसोली, सेठ बन्सीधर विद्यालय तेल्हारा, महात्मा गांधी विद्यालय हातरूण, शिवाजी विद्यालय निंबा, राधाबाई बकाल विद्यालय लोहारा, शिवशंकर विद्यालय उरळ, धनाबाई विद्यालय बाळापूर, स. ल. शिंदे विद्यालय सस्ती, तुळसाबाई कावल विद्यालय पातूर, नूतन विद्यालय आलेगाव, बाबासाहेब धाबेकर विद्यालय बार्शीटाकळी, जय बजरंग विद्यालय रुस्तमाबाद, गीतांजली विद्यालय कान्हेरी सरप, गजानन महाराज विद्यालय महान, ज्ञानप्रकाश विद्यालय पिंजर, भाऊसाहेब बिडकर विद्यालय अनभोरा, मूर्तिजापूर हायस्कूल, अंबामाता विद्यालय गोरेगाव पुं., जयाजी महाराज विद्यालय हिरपूर व विद्याभारती विद्यालय शेलू बाजार या शाळांचा समावेश आहे.