खासदार धोत्रे संसदीय समितीवर
By admin | Published: July 9, 2017 09:46 AM2017-07-09T09:46:18+5:302017-07-09T09:46:18+5:30
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केली निवड.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: लोकसभेच्या संसदीय कामकाजाचा प्रदिर्घ अनुभव लक्षात घेता खासदार संजय धोत्रे यांची १५ सदस्यीय संसदीय समितीमध्ये निवड करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, संसदीय कार्यमंत्री ना.व्यंकैया नायडू यांनी खा.धोत्रे यांची निवड केली.
सभागृहात संसदेचे कामकाज चालविण्यासाठी नियोजनबद्द आराखडा, महत्वाचे विधेयक, विषयांची निवड आणि त्यांची मांडणी करण्यासाठी संसदीय समितीच्या सूचनांवर अंमल केला जातो. संसदेचे अधिवेशन, त्याचा कालावधी व संसदेच्या कामकाजाची आखणी अशा महत्वाच्या मानल्या जाणार्या १५ सदस्यीय समितीमध्ये खा.संजय धोत्रे यांची निवड करण्यात आली आहे. समितीच्या पदसिध्द अध्यक्ष असलेल्या लोकसभा अध्यक्षांच्या मान्यतेने समितीसाठी सदस्यांची निवड केली जाते. यामध्ये सभागृहातील संसदीय कामकाज मंत्री, विविध पक्षांचे गटनेते, जेष्ठ व अभ्यासू अशा १५ सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. लोकसभेच्या अधिवेशनापूर्वी चर्चेसाठी घेण्यात येणारे विषय, वेळेचे नियोजन या सर्व बाबींवर संसदीय कामकाज सल्लागार समितीमध्ये सविस्तर चर्चा केली जाते. त्यानंतर संबंधित विषयांवर संसदेत चर्चा पार पडते. खा.संजय धोत्रे यांच्या कार्यशैली, विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मत लक्षात घेता त्यांची समितीमध्ये निवड करण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.