खासदार कावड मार्गावर; पर्यायी सुविधा देण्याचे निर्देश; ‘डस्ट’ टाकून खडे हटविण्याची सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:55 PM2018-08-29T12:55:05+5:302018-08-29T12:58:48+5:30
निर्माणाधीन रस्त्यावर उच्च प्रतीची ‘डस्ट’ टाकण्यासोबतच रस्त्याची झाडपूस करण्याचे निर्देश खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाºयांना दिले.
अकोला: श्रावणातील चौथ्या सोमवारी शहरात मोठ्या उत्साहात कावड व पालखी उत्सव पार पडणार आहे. अकोला ते गांधीग्राम ते अकोट मार्गाच्या दुरुस्तीचे कामकाज पाहता निर्माणाधीन रस्त्यावर उच्च प्रतीची ‘डस्ट’ टाकण्यासोबतच रस्त्याची झाडपूस करण्याचे निर्देश खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाºयांना दिले. मंगळवारी खा. धोत्रे, आ. शर्मा, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी कावड मार्गाची पाहणी केली.
श्रावण महिन्यात शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्याची परंपरा मागील अनेक वर्षांपासून अविरत सुरू आहे. गांधीग्राम येथून शिवभक्त खांद्यावर कावड घेऊन १९ किलोमीटरचे अंतर पायी चालत शहरात प्रवेश करतात. त्यानंतर राजेश्वराला जलाभिषेक केला जातो. यंदा कावड मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून, कंत्राटदाराच्या संथगतीमुळे रस्ता दुरुस्तीला विलंब झाला आहे. पालखी उत्सवाच्या पृष्ठभूमीवर खा. संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा यांनी कावड मार्गाची पाहणी केली. निर्माणाधीन काँक्रिटीकरणाच्या रस्त्यावर उच्च प्रतीची ‘डस्ट’टाका, रस्त्यावर मुरूमाचे बारीक खडे त्रासदायक ठरण्याची शक्यता पाहता झाडपूस सुरू ठेवा, रस्त्यालगत पथदिव्यांची तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश खा. धोत्रे यांनी ‘एनएचएआय’चे कार्यकारी अभियंता रावसाहेब झाल्टे यांना दिले. यावेळी मनपा स्थायी समिती सभापती विशाल इंगळे, नगरसेवक अजय शर्मा, विजय इंगळे, सतीश ढगे, विलास शेळके, सागर शेगोकार, हरिभाऊ काळे, प्रवीण जगताप, अमोल गोगे, संतोष डोंगरे, वैकुंठ ढोरे, रणजित खेडकर, गिरीश जोशी आदी उपस्थित होते.
अपघातग्रस्त व्यक्तीला केले भरती!
कावड मार्गाची पाहणी करून शहराकडे परत येत असताना खा. संजय धोत्रे यांना आगर येथील गणेश फाले यांचा रस्त्यावर अपघात झाल्याने ते जखमी अवस्थेत आढळून आले. गणेश फाले यांना तातडीने खासदार व आमदारांनी स्वत:च्या वाहनात बसवून थेट खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. ही प्रक्रिया झाल्यानंतर फाले यांच्या कुटुंबीयांना व शिवसेनेचे माजी जि.प. सदस्य हरिभाऊ भालतिलक यांना माहिती देण्यात आली.
दर्जाकडे लक्ष द्या!
कावड-पालखी उत्सवाच्या सबबीखाली रस्त्याचे काम तातडीने पूर्ण केले जात असले तरी त्याच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे खा. धोत्रे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना स्पष्ट केले. त्यासाठी अभियंत्यांनी कामावर जातीने लक्ष ठेवण्याची सूचना खा. धोत्रे यांनी केली.