खासदार संजय धोत्रे करणार जिनेव्हा येथील ई-संसद परिषदेत भारताचे नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 06:18 PM2018-12-02T18:18:13+5:302018-12-02T18:19:42+5:30
अकोला : भारतीय जनता पक्षाचे अकोल्याचे खासदार संजय धोत्रे हे स्वित्झर्लंड देशातील जिनेव्हा येथे ३ ते ६ डिसेंबर २०१८ या कालावधीत होऊ घातलेल्या ८ व्या जागतिक ई-संसद परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करणार आहेत.
अकोला : भारतीय जनता पक्षाचे अकोल्याचे खासदार संजय धोत्रे हे स्वित्झर्लंड देशातील जिनेव्हा येथे ३ ते ६ डिसेंबर २०१८ या कालावधीत होऊ घातलेल्या ८ व्या जागतिक ई-संसद परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करणार आहेत. या परिषदेत उपस्थित राहण्यासाठी खासदार धोत्रे जिनिव्हाला रवाना झाले आहेत.
जिनेव्हा येथील इंटर पार्लमेंटरी युनियन तर्फे ‘सोशल मिडिया टेक्नॉलॉजी’या विषयावर आयोजित या जागतिक परिषदेला सुमारे ११० देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. भारताकडून प्रतिनिधित्व करणारे खा. संजय धोत्रे हे लोकसभेमधून एकमेव खासदार प्रतिनिधीत्व करणार आहेत. संसदीय प्रक्रियेच्या परीवर्तनामध्ये नव-नाविण्यता कशी आवश्यक आहे, संसदीय प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर, ई-संसद विकास, या वर जागतिक स्तरावर खल करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. तंत्रज्ञानाद्वारे आधुनिकीकरण, सांस्कृतिक बदल आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी तंत्रज्ञान हे उत्प्रेरक ठरत असल्याने त्याची महती वाढली आहे. या पार्श्वभूमीवरच सदर ई-संसद परिषद २०१८ मध्ये ‘इनोव्हेशन-२०१८’ हा विषय घेऊनच या परिषदेत सर्वांगानी चर्चा होणार आहे. सदर जागतिक परिषदेत मुख्यत्वे संसद आणि संसदेत तांत्रिक नव कल्पनांच्या प्रभावावर चर्चा केंद्रित होणार आहे.
या परिषदेत जागतिक धोरणाची आखणी होणार असल्याने हा मानवी विकासामध्ये एक क्रांती घडवणारा मैलाचा दगड ठरणार असल्याने भविष्याच्या दृस्तीकोनातून याला अनन्य साधारण महत्व आहे. खा. संजय धोत्रे हे यांत्रिकी अभियंता तसेच विधिज्ञ असून प्रयोगशील व प्रगतीशील शेतकरी, ग्रामीण भागातील तळागाळापासून ते शहरी विकासापर्यंत, एक उद्यमशील तसेच एक अभ्यासू व्यक्तिमत्व असल्याने या जागतिक परिषदेमध्ये भारताची भूमिका अभ्यासपूर्ण रितेने मांडणार आहेत.
पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांनी त्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प डिजिटल इंडिया याला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद चे उपाध्यक्ष खा. संजय धोत्रे यांना महत्वपूर्ण जबाबदारी सोपविल्यामुळे हा अकोला लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांच्या १८ लाख मतदारांचा गौरव असल्याची भावना व्यक्त होत आहे.