‘एमपीएससी’ परीक्षा होणार ३0 केंद्रांवर!
By admin | Published: July 9, 2017 09:28 AM2017-07-09T09:28:21+5:302017-07-09T09:28:21+5:30
प्रतिबंधात्मक आदेश लागू.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महाराष्ट्र लोकसेवा आयोग सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक संयुक्त (पूर्व) परीक्षा रविवार, १६ जुलै २0१७ रोजी होणार असून, यासाठी जिल्हय़ातील ३0 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.
त्या अनुषंगाने संबंधित परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस, वाहनास प्रवेश बंदी घालणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी फौजदारी प्रक्रिया १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
त्यामुळे या ३0 परीक्षा केंद्रांवर रविवार, १६ जुलै रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत केंद्राच्या आतील संपूर्ण परिसरात व केंद्राच्या बाहेरील लागून असलेल्या १00 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा निर्माण होईल, असे कृत्य करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्ती, वाहनास प्रवेशास मनाई राहील. उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश परीक्षा केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी, परीक्षार्थी तसेच परीक्षा केंद्रावर देखरेख करणारे अधिकृत अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी यांच्याबाबत परीक्षा संबंधित कर्तव्य पार पाडण्याच्या दृष्टीने लागू राहणार नाहीत, असे आदेशात नमूद केले आहे.