कुख्यात गुंडाविरुध्द रेल्वे पोलीसांची एमपीडीए कारवाई; पुरपीडीत काॅलनीतील आराेपीस केले एक वर्षासाठी स्थानबध्द
By सचिन राऊत | Published: December 8, 2023 06:54 PM2023-12-08T18:54:52+5:302023-12-08T18:59:37+5:30
या आराेपीस एमपीडीए कारवाइ अंतर्गत एक वर्षासाठी कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.
अकाेला : अकोट फैल परिसरातील पुरपिडीत काॅलनी येथील रहीवासी कुख्यात गुंड रिझवान शहा उर्फ डीएम वल्द इरफान शहा वय २५ वर्षे याच्यावर रेल्वे पाेलिसांनी एमपीडीए कारवाइ केली. त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्हयांमूळे या आराेपीस एमपीडीए कारवाइ अंतर्गत एक वर्षासाठी कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.
आकाेट फैलातील रहीवासी कुख्यात गुंड रिझवान शहा उर्फ डीएम वल्द इरफान शहा वय २५ वर्षे याच्यावर चाेऱ्या करणे, जबरी चोरी करणे, शस्त्रानिशी दुखापत करणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापुर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती. परंतु आराेपी या कारवाइला जुमानत नसल्याने त्याचे विरुध्द गंभीर दखल घेण्यात आली. रिझवान शहा उर्फ डीएम इरफान शहा याच्या गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता मा. पोलीस अधीक्षक, लोहमार्ग नागपुर यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी यांना सादर केला होता.
जिल्हादंडाधिकारी अजित कुभांर यांनी कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतःचे स्त्रोताव्दारे माहीती मिळवून कुख्यात गुंड हा धोकादायक असल्याची खात्री झाल्याने त्यास एक वर्षाकरीता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याचा आदेश ७ डिसेंबर राेजी दिला़. त्यांच्या आदेशावरून रिझवान शहा उर्फ डीएम. इरफान शहा याचा तात्काळ शोध घेवुन त्यास शुक्रवारी० जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले. ही कारवाइ पोलीस अधीक्षक, डॉ. अक्षय शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक वैशाली शिंदे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक अर्चना गाढवे, दावर खान, अतिकेश काळमेघ यांनी केली. कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता रहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांची माहीती संकलीत करण्यात येत असुन त्यांचेविरुध्द एमपीडीए अॅक्ट अन्वये कारवाइ करण्यात येणार आहे.