गटबाजीचे प्रदर्शन टाळण्यासाठी खासदार-नामदारांची भाषणे नाहीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 01:31 AM2017-09-16T01:31:36+5:302017-09-16T01:31:43+5:30
भाजपच्या कुठल्याही कार्यक्रमात पालकमंत्री व खासदार गटामधील गटबाजी हमखास समोर येते. या दोन्ही गटातील नेते भाषणाच्या ओघात एकमेकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीका करतात. यामुळे गटबाजी अधिक ठळकपणे अधोरेखित होत असल्याने, शुक्रवारी भाजपाच्या संघटनात्मक बैठकीत केवळ संघटनेतील पाच लोकांनाच भाषणाची संधी देऊन नामदार व खासदारांची भाषणे टाळण्याचा प्रकार घडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : भाजपच्या कुठल्याही कार्यक्रमात पालकमंत्री व खासदार गटामधील गटबाजी हमखास समोर येते. या दोन्ही गटातील नेते भाषणाच्या ओघात एकमेकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीका करतात. यामुळे गटबाजी अधिक ठळकपणे अधोरेखित होत असल्याने, शुक्रवारी भाजपाच्या संघटनात्मक बैठकीत केवळ संघटनेतील पाच लोकांनाच भाषणाची संधी देऊन नामदार व खासदारांची भाषणे टाळण्याचा प्रकार घडला आहे.
राष्ट्रीय महासचिव सरोज पांडे भाजपच्या संघटनात्मक बाबींचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी अकोल्यात आल्या होत्या. त्यांनी भाजपच्या प्रमुख पदाधिकार्यांचा वर्ग घेत, संघटन कार्यावर प्रश्नांची सरबत्ती करून, पदाधिकार्यांना घाम फोडला. सरोज पांडे यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना, अनेक आघाड्यांचे पदाधिकारी चाचपडत होते. सरोज पांडे यांनी भाजपच्या विविध आघाड्यांच्या कामाचा आढावा आणि त्यांच्या कामाची पद्धत जाणून घेतली. जे पदाधिकारी बैठकीला अनुपस्थित आहेत, त्यावर नाराजी व्यक्त करीत, नेते म्हणून पदे बळकावली. त्यांना घरचा रस्ता दाखवा, अशा शब्दात खडेबोल सुनावले. यावेळी मंचावर खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, प्रदेश सरचिटणीस डॉ. रामदास आंबटकर, भाजपचे संघटनमंत्री उपेंद्र कोठीकर, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, शहराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, उपमहापौर वैशाली शेळके, अँड. मोतीसिंह मोहता व श्रावण इंगळे आदींची उपस्थिती होती. या नेत्यांपैकी सरोज पांडे यांचे व्यतिरिक्त तेजराव थोरात, किशोर मांगटे पाटील, रामदास आंबटकर, उपेंद्र कोठीकर यांनाच भाषणाची संधी मिळाली. त्यामुळे मंचावर उपस्थित लोकप्रतिनिधींना केवळ मंचावर स्थान ग्रहण करून बसून राहणे एवढेच कार्य उरले होते. संघटनात्मक आढावा असल्यामुळे संघटनेत काम करणार्या पदाधिकार्यांनी मनोगत व्यक्त केले. हे सर्मथन पक्षपातळीवर कदाचित असू शकते मात्र, भाषणाच्या माध्यमातून मतभेद समोर येऊ नये म्हणूनच लोकप्रतिनिधींची भाषणे टाळली असावी, अशी चर्चा आता राजकीय वतरुळात सुरू झाली आहे.
-