खासदारांचा अल्टिमेटम : अकोल्याच्या राजकारणात चर्चा फक्त ‘पंधरा दिवसांचीच’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 01:07 AM2018-03-11T01:07:36+5:302018-03-11T01:07:36+5:30
अकोला : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील व खासदार संजय धोत्रे या दोघांमधील वादामुळे खासदार धोत्रे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पंधरा दिवसांच्या अल्टिमेटमचीच चर्चा सध्या अकोल्याच्या राजकारणात सुरू आहे. पंधरा दिवसांनंतर काय होणार? पालकमंत्र्यांचे मंत्रिपद जाणार का? खासदार पक्ष सोडतील का? त्यांच्यासोबत कोण-कोण जाऊ शकते? अशा एक ना अनेक प्रश्नांची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात आहे.
राजेश शेगोकार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील व खासदार संजय धोत्रे या दोघांमधील वादामुळे खासदार धोत्रे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पंधरा दिवसांच्या अल्टिमेटमचीच चर्चा सध्या अकोल्याच्या राजकारणात सुरू आहे. पंधरा दिवसांनंतर काय होणार? पालकमंत्र्यांचे मंत्रिपद जाणार का? खासदार पक्ष सोडतील का? त्यांच्यासोबत कोण-कोण जाऊ शकते? अशा एक ना अनेक प्रश्नांची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात आहे. वाढत्या उन्हासोबतच या चर्चेमुळे राजकारण तापत आहे. खासदारांनी तापविलेल्या या राजकीय तव्यावर इतर पक्षही आपली ‘पोळी’ आपोआपच भाजली जाणार का? या अंदाजाने खूश आहेत.
घुंगशी येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या दरम्यान झालेल्या भांडण्याच्या निमित्ताने खा.धोत्रे यांनी १ मार्च रोजी आपल्या मनातील भावना माध्यमांसमोर उघड करून ना.डॉ.पाटील यांच्यावर निशाणा साधला. पाटील यांची मेंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अन्यथा १५ दिवसात भुमिका स्पष्ट करण्याचा अल्टिमेटम दिला. या नंतर राजकीय घडामोडी अधिक वेगवान झाल्या. ३ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे औरंगाबादवरून बुलडाणा येथे जाणार होते मात्र ऐनवेळी त्यांनी वाट वाकडी करीत मार्गे अकोला असा पर्याय निवडला. दोन्ही नेते अकोल्यात डेरे दाखल झाले मात्र खासदार धोत्रे यांना कौटुंबिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी जावे लागल्याने नेत्यांचा थेट संवाद होऊ शकला नाही. मात्र या दौºयानंतर अकोल्यातील काही नेते व पक्षाच्या पदाधिकाºयांचे एक शिष्टमंडळ गडकरी वाडयावर हजेरी लावून आले आहेत. त्यांना सध्या सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे त्यामुळेच खासदार गट सध्या शांत दिसत आहे. आता या दोन नेत्यांच्या वादात आता नितीन गडकरी यांची भूमिका महत्त्वाची राहणार असल्याची चर्चा भाजपाच्या वर्तुळात सुरू झाली आहे.
एकीकडे पक्षपातळीवर या वादावर तोडगा काढण्यासाठी काय पर्याय शोधला जाणार आहे, हे अजूनतरी गुलदस्त्यात आहे. मात्र, सोशल मीडियावर अनेक पर्याय खुलेआम चर्चेत आले आहेत. ‘व्हॉट्स अॅप’ विद्यापीठातून पदव्या घेतलेले अनेक विद्यार्थी सोशल मिडियावर सूतावरून स्वर्ग गाठताना दिसत आहेत.
अनेकांनी तर खा. धोत्रे यांच्या हातात राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ बांधूनही टाकले असून, ते १५ मार्च रोजी पंधरा दिवस पूर्ण झाल्यावर कोणाचा ‘टाइम’ कसा राहील हे सांगतील हे जाहीर करून टाकले आहे. अनेकांनी पुढची लोकसभा निवडणुक धोत्रे-पाटील यांच्यात होणार असल्याचीही गणिते मांडली आहेत, तर दुसरीकडे ना.डॉ. पाटील यांच्या गोटातून त्यांच्या जुन्या भाषणांची लिंक, त्यांनी केलेल्या कामांचा तपशील व्हायरल होत असल्याने सध्या सोशल मीडियाचा राजकीय अवकाश भाजपाच्या या दोन नेत्यांनीच व्यापला आहे. विशेष म्हणजे खा. धोत्रे यांनी इशारा दिल्यानंतर त्याच दिवशी डॉ. पाटील यांनी प्रतिक्रिया दिली तेव्हापासून या दोन्ही नेत्यांनी या प्रश्नावर जाहीररीत्या कुठेही भाष्य केले नसल्याने ‘पंधरा दिवसानंतर’ काय याचे अंदाज बांधण्याशिवाय राजकीय क्षेत्रात दुसरा पर्याय नसल्याने अशा चर्चांना उधाण आले आहे.
एकीकडे भाजपामध्ये सर्वांचे लक्ष पक्षश्रेष्ठी अन् खा. धोत्रे यांच्या अल्टिमेटमची तारीख याकडे लागले असून, दुसरीकडे काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेसमध्ये नव्याने आडाखे मांडल्या जात आहेत. खा. धोत्रे यांनी दुसºया पक्षाचा पर्याय निवडलाच, तर तो कोणता असेल? जर राष्टÑवादी असेल तर तेथील विद्यमान नेत्यांची कोणती अडचण होऊ शकते, यापासून तर राष्टÑवादीच्या घड्याळाचा गजर वाढेल इथपर्यंत केवळ चर्चा अन् चर्चाचे गुºहाळ एवढेच काय ते सुरू आहे. आता या गुºहाळातून सर्व काही आलबेल, पक्ष महत्त्वाचा असे परवलीचे शब्द बाहेर पडून सारे काही ‘गोड’ होते की भलतेचं ‘गौड बंगाल’ बाहेर येते, हे पाहणे रंजक ठरेल.