महावितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता दोन हजारांची लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:03 PM2019-01-29T12:03:41+5:302019-01-29T12:14:00+5:30
अकोला: महावितरणच्या अकोला शहर विभागाचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता मोरेश्वर शिरसे याला दोन हजार रुपयांची लाच घेतांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने मंगळवारी सकाळी ११ वाजता दुर्गा चौकातील महावितरणच्या कार्यालयातून रंगेहाथ अटक केली.
अकोला: महावितरणच्याअकोला शहर विभागाचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता मोरेश्वर शिरसे याला दोन हजार रुपयांची लाच घेतांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने मंगळवारी सकाळी ११ वाजता दुर्गा चौकातील महावितरणच्या कार्यालयातून रंगेहाथ अटक केली. क्लास वन अधिकारी असलेल्या शिरसे याने केवळ दोन हजार रुपयांची लाच घेतल्याने महावितरण कार्यालयातील लाचखोरांचे पितळ उघडे झाले आहे.
सौर उर्जा प्रकल्पाच्या निर्मीतीसाठी योग्यता प्रमाणपत्र (फीजीबीलीटी रिपोर्ट) देण्यासाठी तसेच तक्रारकर्त्याने काही विजचोरांची माहिती महातिवरण कंपनीला दिल्यानंतर त्यामधील १० टक्के बक्षिसाची रक्कम देण्यासाठी महावितरणच्या अकोला शहर विभागाचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता मोरेश्वर शिरसे याने तक्रारकर्त्यास २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र तडजोडीनंतर २२ हजार रुपयांमध्ये व्यवहार ठरला. त्यानंतर सुरुवातीचा दोन हजार रुपयांची रक्कम देण्यासाठी मंगळवारी सकाळी दुर्गा चौकातील शहर विभागाच्या कार्यालयाचे ठिकाण ठरले. मात्र तक्रारकर्त्याला लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार आधीच अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता २२ हजार रुपयांची लाच मागीतल्याचे समोर आले तसेच ‘टोकन’ म्हणूण दोन हजार रुपये मंगळवारी देण्याचे ठरले. ही लाचेची रक्कम अभियंता शिरसे हा स्विकारत असतांनाच सापळा रचून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने त्याला दोन हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक केली. त्याच्याकडून ही रक्कम जप्त करण्यात आली असून मंगळवारी दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमूख संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनात संतोष दहीहंडे,पोना सुनील राऊत,पोशि राहुल इंगळे,पोशि सुनील येलोने,पोशि निलेश शेगोकार,चालक कैलास खडसे यांच्यासह कर्मचाºयांनी केली.