महावितरणची नागपूर परिक्षेत्रात धडक मोहिम : सात जिल्ह्यात ८७ लाखांच्या वीजचोऱ्या, अनियमितता उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 06:57 PM2018-01-20T18:57:09+5:302018-01-20T19:01:26+5:30
अकोला : महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागातर्फे ४ ते ६ जानेवारी दरम्यान विदर्भात सर्वत्र राबविण्यात आलेल्या वीजचोरी विरोधातील विशेष मोहीमेत ६६ लाख ३२ हजार ४२२ रुपये मुल्यांकनाच्या तब्बल ९७ वीजचोऱ्या उघडकीस आल्या.
अकोला : महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागातर्फे ४ ते ६ जानेवारी दरम्यान विदर्भात सर्वत्र राबविण्यात आलेल्या वीजचोरी विरोधातील विशेष मोहीमेत ६६ लाख ३२ हजार ४२२ रुपये मुल्यांकनाच्या तब्बल ९७ वीजचोऱ्या उघडकीस आल्या. तर २१ लाख ३६ हजार २२१ रुपये मुल्यांकनाच्या ८० प्रकरणांत इतर अनियमितता आढळून आल्या आहेत.
सुरक्षा व अंमलबजावणी विभागातर्फ़े महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील नागपूर, अकोला, यवतमाळ, वाशिम, अमरावती, बुलढाणा आणि वर्धा या सातही जिल्ह्यात ४ ते ६ जानेवारी दरम्यान ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेत महावितरणची राज्यभरातील ३० मंडलांतील भरारी पथकांचा सहभाग होता. महावितरणचे कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) अरविंद साळवे, नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत आणि उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) मंगेश वैद्य यांच्या मारदर्शनात राबविण्यात आलेल्या या विशेष मोहीमेत सातही जिल्ह्यातील ४०१ वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ९७ ठिकाणी थेट वीजचोरी, तर ८० ठिकाणी वीज वापरातील अनियमितता आढळून आल्या. या दोन्हीचे मुल्यांकन तब्बल ८७ लाख ६८ हजार ६४३ रुपये आहे. उघडकीस आलेल्या एकूण १७७ प्रकरणांत तब्बल ९ लाख ८७ हजार ६९ युनिट्सची वीजचोरी झाल्याचे अनुमानित आहे.
अनियमिततीची सर्वाधिक ३७ प्रकरणे वाशिम जिल्ह्यातील
या मोहीमेत वीजचोरी आणि वीज वापरातील अनियमिततीची सर्वाधिक ३७ प्रकरणे वाशिम जिल्ह्यातील असून, त्याखालोखाल नागपूरची ३६, अकोला २९, अमरावती २६, बुलढाणा २३, यवतमाळ २१ आणि वर्धा जिल्ह्यातील १३ प्रकरणे उघडकीस आली आहेत. याशिवाय थेट वीजचोरीच्या ९७ प्रकरणांपैकी सर्वाधिक १९ नागपूर जिल्ह्यातील असून त्याखालोखाल अमरावती जिल्ह्यातील १८, बुलढाणा जिल्ह्यातील १५, अकोला जिल्ह्यातील १४, वाशिम जिल्ह्यातील १३ तर यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील प्रत्येकी ९ वीजचोºयांचा समावेश आहे.