महावितरणच्या कार्यालयांमध्येच नाहीत ‘एलईडी’ दिवे

By admin | Published: June 4, 2016 02:17 AM2016-06-04T02:17:31+5:302016-06-04T02:17:31+5:30

लोकांना एलईडी दिवे घेण्यासाठी प्रोत्साहित करणा-या महावितरणच्या कार्यालयांमध्येच वापर नसल्याचे वास्तव.

MSEDCL does not have 'LED' lights | महावितरणच्या कार्यालयांमध्येच नाहीत ‘एलईडी’ दिवे

महावितरणच्या कार्यालयांमध्येच नाहीत ‘एलईडी’ दिवे

Next

अतुल जयस्वाल / अकोला
केंद्र सरकारच्या उन्नत ज्योती अफॉर्डेबल एलईडी फॉर ऑल (उजाला) या उपक्रमांतर्गत देशभरात सुरू असलेल्या एलईडी बल्ब वितरण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी राज्यात महावितरण या वीज कंपनीकडे आहे. लोकांना एलईडी दिवे घेण्यासाठी प्रोत्साहित करणार्‍या महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवनासह इतर कार्यालयांमध्ये मात्र या दिव्यांचा वापर होत नसल्याचे वास्तव आहे. महावितरणचा हा प्रकार लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण या म्हणीचा प्रत्यय देणारा आहे. विजेची बचत व्हावी, यासाठी केंद्र सरकारने उजाला या उपक्रमांतर्गत एलईडी बल्ब वितरणाची योजना सुरू केली आहे. या योजनेस महाराष्ट्रात वीज ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. महाराष्ट्रात जुलै २0१५ मध्ये सुरू करण्यात आलेल्या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी महावितरणची आहे. आतापर्यंत राज्यात पावणेदोन कोटींपेक्षाही अधिक वीज ग्राहकांनी एलईडी दिवे खरेदी केल्याची माहिती आहे. अकोला शहर व तालुक्यांच्या ठिकाणी एलईडी बल्ब वितरणाचे स्टॉल लागलेले आहेत. लोकांना ऊर्जाबचतीसाठी प्रोत्साहित करून, त्यांना एलईडी दिवे खरेदी करण्याचा सल्ला देणार्‍या महावितरणच्या कार्यालयांमध्ये मात्र जीएसएल, सीएफएल किंवा ट्यूबलाइट यांसारखे पारंपरिक दिवेच असल्याचे वास्तव ह्यलोकमतह्णने शुक्रवारी केलेल्या पाहणीत दिसून आले. अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या 'विद्युत भवन'सह महावितरणच्या शहरातील इतर कार्यालयांमध्येही उजेडासाठी पारंपरिक दिवेच लावलेले असल्याचे चित्र आहे. कार्यालयांमधील सद्याचे ट्यूबलाईट सुस्थितीत असून, ते नादुरुस्त झाल्यावर त्या ठिकाणी एलईडी दिवे बसविण्यात येतील, असे सांगण्यात आले.

कोठे काय आढळले?
महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय अकोला येथे आहे. तीन जिल्हय़ांचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवन या इमारतीमधील अधिकार्‍यांचे कक्ष, सभागृह, गॅलरी आदी ठिकाणी सीएफएल दिवे किंवा ट्यूबलाइट लावलेले आहेत.महावितरणच्या अकोला ग्रामीण विभागाचे मुख्यालय असलेल्या गोरक्षण रोड स्थित इमारतीतही उजेडासाठी ट्यूबलाइट आहेत.

जिल्हय़ात ९ लाखांवर एलईडी दिव्यांची विक्री
ही योजना सुरु झाल्यापासून जिल्हय़ात ९ लाख ११ हजार ६३९ एलईडी दिव्यांची विक्री करण्यात आली आहे. महावितरणने एलईडी बल्ब खरेदी करण्यासाठी वीजग्राहकांना प्रोत्साहित केले. परंतु, स्वत:च्या कार्यालयात एलईडी बल्ब लावण्याचा विसर महावितरणाला पडला.

Web Title: MSEDCL does not have 'LED' lights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.