१६५ रोहीत्रे, ३८८ वीज खांब झाले वेलीमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 16:02 IST2020-01-18T16:02:50+5:302020-01-18T16:02:58+5:30
या मोहीमेत या पथकाकडून शुक्रवारी एकाच दिवशी १६५ रोहीत्रे आणि ३८८ वीज खांबावर चढलेल्या वेली तसेच झाडे - झुडूपे काढून वीज यंत्रणा सुरक्षित करण्यात आली.

१६५ रोहीत्रे, ३८८ वीज खांब झाले वेलीमुक्त
अकोला : अपघात विरहीत आणि अखंडित वीज पुरवठ्यासाठी वीज खांब तसेच रोहीत्रावर चढणाऱ्या वेली, झाडे -झुडूपे काढण्याची मोहीम हाती घेत जिल्हयातील वीज यंत्रणा सुरक्षित करून सुरक्षा सप्ताहाचा समारोप करण्यात आला.
महावितरणची यंत्रणा उघड्यावरच आणि सर्वदुर पसरल्याने अनेक ठिकाणी रोहीत्रे आणि वीज खांबे ही वेली तसेच झुडूपे यांच्या विळख्यात वारंवार अडकतात आणि वीज यंत्रणा असुरक्षित करतात. परिणामी थोडी हवा आली तरी खंडित वीज पुरवठ्याला सामोरे जावे लागते. शिवाय वेली व झुडूपे ही ओली असल्यामुळे यात व खांबाला लावलेल्या तानात वीज प्रवाह उतरण्याची शक्यता अधिक असते. हे अपघाताचे कारण बनू नये म्हणून जिल्हयात सुरक्षित वीज यंत्रणेतून वीज पुरवठा करण्यासाठी रोहीत्रे व वीज खांबावरील वेली व झाडे-झुडूपे काढण्याची मोहिम हाती घेण्यात आली.
मुख्य अभियंता अनिल डोये यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या नेतृत्वात अकोला शहर ,अकोला ग्रामिण आणि अकोट विभागाचे कार्यकारी अभियंते यांच्या पुढाकाराने एकून २६६ लोकांचे पथक तयार करून मोहीम हाती घेण्यात आली. या मोहीमेत या पथकाकडून शुक्रवारी एकाच दिवशी १६५ रोहीत्रे आणि ३८८ वीज खांबावर चढलेल्या वेली तसेच झाडे - झुडूपे काढून वीज यंत्रणा सुरक्षित करण्यात आली.
११ ते १७ जानेवारी दरम्यान पार पडलेल्या वीज सुरक्षा सप्ताहात महावितरण अकोला जिल्हयाच्यावतीने वीज सुरक्षेचा संदेश देणारी रॅली काढण्यात आली,काही शांळात जाऊन विद्यार्थ्यांशी संवांद मोहीम राबविली, वीज पुरवठा करण्यासाठी दिवस रात्र धावणाºया कर्मचाऱ्यांची आरोग्य सुरक्षेसाठी भव्य रोग निदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. याच बरोबर सुरक्षित वीज सेवेसाठी जिल्हयातील रोहीत्रे व वीज खांबे ही वेलीमुक्त करण्यात आली.