महावितरणच्या रॅलीत वीज सुरक्षेचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 06:25 PM2020-01-14T18:25:31+5:302020-01-14T18:29:29+5:30
अकोला : महावितरणच्या अकोला मंडळातर्फे वीज सुरक्षा सप्ताहनिमित्त मंगळवारी शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीत वीज सुरक्षेचा जागर करण्यात आला.
अकोला : महावितरणच्याअकोला मंडळातर्फे वीज सुरक्षा सप्ताहनिमित्त मंगळवारी शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीत वीज सुरक्षेचा जागर करण्यात आला.
अकोला परिमडळाचे मुख्यालय असलेल्या सकाळी विद्युत भवन कार्यालयातून सकाळी नऊ वाजता रॅलीचा प्रारंभ झाला. ही रॅली नंतर दुर्गा चौक, अग्रेसन चौक, संतोषी माता मंदीर असे मार्गक्रमण करत पुन्हा विद्युत भवन याच ठिकाणी आली. तेथे या सुरक्षा रॅलीचा समारोप करण्यात आला. वीज सुरक्षा ही केवळ महावितरण कर्मचाऱ्यांशी संबधीत नाही तर घरातील पंख्यांपासून तर वॉशिंग मशिनपर्यंत वीजेवरची सर्व उपकरणे हाताळतानाही तेवढीच सजगता असणे गरजेचे आहे. त्यासाठी या रॅलीत जनजागृतीसाठी वीज सुरक्षेचे संदेश देणारे पोस्टर्स ,बॅनर्स आणि ध्वनीफितीचा गजर करण्यात आला.
समारोप प्रसंगी मुख्य अभियंता अनिल डोये यांनी वीज सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले. वीजेपुढे चुकीला माफी नाही. त्यामुळे विजेची उपकरणे हाताळतांना मग तो विजेची कामे करणारा प्रशिक्षीत कर्मचारी असो वा ईतर कोणी असो सजगता हीच एकमेव सुरक्षा आहे. ही सजगता फक्त सुरक्षा सप्ताहापर्यंत किंवा काही दिवसासाठी मयार्दीत न राहता ती निरंतर असायला हवी , वीजेची उपकरणे हाताळतांना किमांन आपल्या कुटूंबाला आठवण करून सुरक्षेची सर्व साधणे वापरावीत असे आवाहन मुख्य अभियंता अनिल डोये यांनी केले.
या रॅलीत अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट, अधिक्षक अभियंता राहुल बोरीकर ,कार्यकारी अभियंते प्रशांत दाणी, अजय खोब्रागडे, गजेंद्र गडेकर, विजय महाजन, अविनाश चांदेकर, विद्युत निरिक्षक राजू महालक्ष्मे ,उपमुख्य औद्योगिक अधिकारी विषाल पिपरे , सहाय्यक महाव्यवस्थापक सुमेध बोधी आदींनी भाग घेत वीज सुरक्षेबाबत जनजागृती केली. या सुरक्षा रॅलीत जिल्हातील तीनेशेपेक्षा जास्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
रोग निदान शिबिराचा २०७ अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ
उन ,वारा ,पाऊस, रात्र - दिवस न बघता आपल्या ग्राहकांना अखंडित वीज सेवा देण्यासाठी धडपडणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांसाठी वीज अपघात सुरक्षेबरोबरच त्यांची आरोग्याची सुरक्षा लक्षात घेता महावितरण अकोला मंडळ कार्यालय व ओझोन हाॅस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोग निदान शिबीराचे आयोजनही विद्युत भवनात करण्यात आले होते.
या शिबिरात वीज अपघात झाल्यानंतर बेशुध्द पडलेल्या व्यक्तीला शुध्दीवर आणण्यासाठी प्रथमोपचार म्हणून काय करायला हवे याबाबत डाॅ. आशिष गिऱ्हे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच यावेळी प्रथमोपचार म्हणून संजीवनी क्रीया (CPR -Cardio Pulmonary Resuscitation ) म्हणजेच बेशुध्दावस्थेत असलेल्या व्यक्तीला कसा आणि किती वेळ CPR द्यावा याबाबत दृकश्राव्य माध्यम तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाव्दारे समजावण्यात आले. तसेच संजीवनी क्रीया हे केवळ वीज अपघाताने बेशुध्द झालेल्या व्यक्तीसाठीच नसून ती क्रीया हृदय आणि फुपुसाला पंपिंग करणारी असल्याने ती चक्कर येऊन बेशुध्द पडलेल्या व्यक्तीवरही तेवढीच परिणामकारक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सकाळी ११ ते संध्याकाळी ०५ वाजेपर्यंत पार पडलेल्या या शिबिरात जिल्हयातील महावितरणच्या २०७ अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत हृदय रोग, ओर्थोपेडीक व जोइंट रिप्लेसमेंट,जनरल, नेत्र,दंत व मुखरोग आदी आजाराबाबत आपली तपासणी प्रसिध्द तज्ञ अणुक्रमे डॉ. राम बिहाडे, डॉ.समिर देशमुख, डॉ.अचिन मुरारका, डॉ. अमोल धोरण, डॉ. शुभांगी बोराखडे आणि डॉ. राहुल सुरूशे यांच्या मार्गदर्शनाखाली करून घेतली.