महावितरण : चार मुख्य अभियंत्यांच्या बदल्या; दोन अधीक्षक अभियंत्यांना पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 06:59 PM2020-08-19T18:59:01+5:302020-08-19T18:59:13+5:30
महावितरणचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगड येथून १८ आॅगस्ट रोजी बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
अकोला : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या औरंगाबाद, भांडूप शहर, रत्नागिरी या तीन परिमंडळांच्या मुख्य अभियंत्यांसह प्रशासकीय कार्यालयातील एक अशा चार मुख्य अभियंत्यांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय नागपूर मंडळ व प्रशासकीय कार्यालयातील दोन अधीक्षक अभियंत्यांना मुख्य अभियंता म्हणून पदोन्नतीवर बदली करण्यात आली आहे. महावितरणचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगड येथून १८ आॅगस्ट रोजी बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
भांडूप शहर परिमंडळाच्या मुख्य अभियंता पुष्पा रामचरण चव्हाण यांची बदली प्रशासकीय कार्यालयातील विशेष प्रकल्प विभागात करण्यात आली आहे. औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश लक्ष्मण गणेशकर यांना भांडूप शहर परिमंडळ देण्यात आले आहे. मुंबई येथील प्रशासकीय कार्यालयातील मुख्य अभियंता भूजंग बळीराम खंडारे यांची बदली औरंगाबाद परिमंडळात करण्यात आली आहे. रत्नागिरी परिमंडळाचे मुख्य अभियंता रंजना संजयकुमार पगारे यांना नाशिक झोन देण्यात आले आहे.
कोल्हापूर, नागपूरला मिळाले नवे मुख्य अभियंता
कोल्हापूर आणि नागपूर परिमंडळाला पदोन्नतीने बदली झालेले मुख्य अभियंता मिळाले आहेत. प्रशासकीय कार्यालयातील अधीक्षक अभियंता प्रभाकर निमाले यांना पदोन्नत करून त्यांची बदली रिक्त असलेल्या कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंतापदी करण्यात आली आहे. नागपूर शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके यांची पदोन्नती करून त्यांना नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.