'एमएसआरटीसी' सरळ सेवा भरतीच्या पोर्टल वर अर्ज अपलोड होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 03:28 PM2019-01-21T15:28:18+5:302019-01-21T15:28:39+5:30
अकोला: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकाच्या सरळ सेवा भरतीचे पोर्टलवर गत तीन दिवसांपासून अर्ज अपलोड होत नसल्याने शेकडो उमेदवारांचा हिरमोड होत आहे.
- संजय खांडेकर
अकोला: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकाच्या सरळ सेवा भरतीचे पोर्टलवर गत तीन दिवसांपासून अर्ज अपलोड होत नसल्याने शेकडो उमेदवारांचा हिरमोड होत आहे. नोकर भरतीच्या आॅनलाइन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत देवनागरी लिपी कंपोज करण्याची अट आहे; मात्र देवनागरी लिपी कंपोज होत नसून, ४०१ एक्सेस डीनाय असा संदेश देत उमेदवारांचा अर्ज फेटाळला जात आहे. आॅनलाइन नोकरभरतीत येत असलेल्या या एररमुळे उमेदवार चिंतेत पडले आहे. एमएसआरटीसीच्या वरिष्ठांनी तातडीने ही समस्या लक्षात घेऊन पर्याय खुले करावेत, अशी मागणी राज्यभरातून होत आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात चालक आणि वाहकच्या ४,४१६ पदांची सरळ सेवा भरती होत आहे. त्यासाठी १७ जानेवारीपासून ८ फेब्रुवारी १९ पर्यंत आॅनलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून उमेदवार आॅनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी सायबर कॅफे आणि संगणकीय सेवा देणाऱ्या कार्यालयांचे उंबरठे झिजवित आहे; मात्र त्यांचे अर्ज पोर्टल घेईना अशी स्थिती निर्माण झाली आहे. एमएसआरटीसीच्या पोर्टलवर अनेक नव्या तांत्रिक समस्या उद्भवत असून, त्यामुळे उमेदवार आणि सायबर कॅफेचे संचालक कमालीचे त्रासले आहे. आॅनलाइन अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेत आधी फोटो अपलोड करायचा असतो; मात्र बराच वेळ या साइटवर उमेदवाराचा फोटो अपलोड होत नाही. कसाबसा फोटो अपलोड झाला तर त्यानंतरची प्रक्रिया पूर्ण होत नाही. इंग्रजीसह मराठी/देवनागरी लिपीत नाव लिहिण्याची सक्ती पोर्टलवर करण्यात आली आहे. इंग्रजीत नाव स्वीकारले जाते; मात्र मराठी-देवनागरी लिपी काही केल्याने कंपोज होत नाही. दिलेल्या सूचनेप्रमाणे वाय दाबूनही लिहिल्या जात नाही. कॉपीपेस्ट करूनही रकाण्यामध्ये मराठी येत नसल्याने उमेदवारांना अर्ज भरताना तांत्रिक अडचणी समोर येत आहे. एमएसआरटीसीचे सरळ सेवा भरतीचे पोर्टल तीन दिवसांपासून अर्ज घेत नसल्याने उमेदवार हतबल झाले आहे. एमएसआरटीसीचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांच्याशी संपर्क साधला; मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
गेल्या तीन दिवसांपासून शेकडो उमेदवारांच्या आॅनलाइन अर्ज दाखल करण्यात तांत्रिक अडचण येत आहे. पोर्टलवर मराठी लिपी लिहिल्या जात नाही. त्यामुळे अर्ज फेटाळल्या जात आहे.
- अनिल मानकर, सायबर कॅफे संचालक, अकोला.