सेवा स्मार्ट होण्याआधीच ‘एमएसआरटीसी’चे सर्व्हर डाउन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 03:29 PM2019-04-13T15:29:53+5:302019-04-13T15:30:04+5:30
अकोला: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची प्रवासी पासची सेवा स्मार्ट होण्याआधीच अडचणीत सापडली आहे.
- संजय खांडेकर
अकोला: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची प्रवासी पासची सेवा स्मार्ट होण्याआधीच अडचणीत सापडली आहे. गत तीन दिवसांपासून ‘एमएसआरटीसी’चे सर्व्हर डाउन असल्याने राज्यातील शेकडो प्रवाशांसह विविध प्रकारच्या पासधारकांना त्याचा फटका सोसावा लागत आहे.
एसटी महामंडळाने यंदाच्या आर्थिक वर्षापासून अनेक सेवा स्मार्ट करण्यास करण्यास सुरुवात केली आहे. नियोजित प्रवास, शैक्षणिक सवलत, ज्येष्ठ नागरिक, शारीरिक दिव्यांग, माजी सैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि माजी कर्मचारी आदींना विविध प्रकारच्या सवलती पासेस दरवर्षी दिल्या जातात. या पासेसची संपूर्ण माहिती विभागीय कार्यालयात नोंदविलेली असायची. त्यासंबंधीची यादी मुंबईच्या मुख्य कार्यालयास पाठविली जात असे; मात्र परिवहन मंत्रालयाने यंदापासून या सर्व नोंदी आॅनलाइन करीत प्रत्येक पासधारकास स्मार्ट कार्ड देण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला; मात्र ही स्मार्ट सेवा पुरविण्यासाठी लागणारे सक्षम सर्व्हर अद्याप महामंडळाकडे नाही. ही सेवा स्मार्ट होण्याआधीच अडचणीत आली आहे. गत तीन दिवसांपासून सर्व्हर डाउन असल्याने राज्यभरातील शेकडो प्रवासी आणि पासधारक एसटी कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत.
अशी होते आॅनलाइन नोंद
नवीन स्मार्ट कार्डसाठी प्रत्येक पासधारकांना आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, आणि ५१ रुपयांचे शुल्क भरावे लागते. त्यानंतर एसटीच्या विभागीय कार्यालयातून पासधारकाची व्यक्तिगत माहिती आॅनलाइन अपलोड करावी लागते. याच ठिकाणी आॅनलाइन फोटो घेतला जातो. त्यानंतर मुंबईहून स्मार्ट कार्ड तयार होऊन येणार आहे; मात्र सर्व्हर डाउन असल्याने ही प्रक्रिया थांबली आहे.