रस्त्यांवर चिखल;‘एपी अ‍ॅण्ड जीपी’ कंपनीची मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:16 PM2018-09-19T12:16:11+5:302018-09-19T12:16:21+5:30

अकोला : शहरात जलवाहिनीचे जाळे टाकताना मुख्य रस्त्यांसह प्रभागातील अंतर्गत रस्त्यांलगतचा भाग खोदल्या जात आहे. अनेक प्रभागांमध्ये चक्क रस्ते खोदण्यात आल्याचे चित्र आहे.

 Mud on the streets; 'AP and GP' company's arbitrariness | रस्त्यांवर चिखल;‘एपी अ‍ॅण्ड जीपी’ कंपनीची मनमानी

रस्त्यांवर चिखल;‘एपी अ‍ॅण्ड जीपी’ कंपनीची मनमानी

Next

अकोला : शहरात जलवाहिनीचे जाळे टाकताना मुख्य रस्त्यांसह प्रभागातील अंतर्गत रस्त्यांलगतचा भाग खोदल्या जात आहे. अनेक प्रभागांमध्ये चक्क रस्ते खोदण्यात आल्याचे चित्र आहे. मंगळवारी शहराच्या काही भागात आलेल्या पावसामुळे खोदलेल्या मातीचा चिखल रस्त्यांवर पसरल्यामुळे अनेक वाहनधारक घसरून पडल्यामुळे किरकोळ जखमी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. जलवाहिनी टाकल्यानंतर रस्त्यावरची माती हटवून त्यावर ताबडतोब रोलर फिरविण्याचे निर्देश वजा सूचना महापौर विजय अग्रवाल यांच्यासह प्रशासनाने ‘एपी अ‍ॅण्ड जीपी’ कंपनीला दिले होते. कंपनीने या सर्व सूचनांना पायदळी तुडविण्याचे काम सुरूच ठेवल्याचे दिसून येत आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या ‘अमृत’ योजनेच्या माध्यमातून संपूर्ण शहराची जलवाहिनी बदलण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामावर देखरेख ठेवण्यासाठी शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. शहरात पहिल्या टप्प्यातील कामासाठी राज्य शासनाने ११० कोटी मंजूर केले. त्यापैकी ८७ कोटींची निविदा प्रकाशित करण्यात आली होती. जलवाहिनीचे जाळे टाकण्याचा कंत्राट ‘एपी अ‍ॅण्ड जीपी’ कंपनीला मिळाला. आज रोजी शहरात ४१८ किलोमीटरपैकी ९७ किलोमीटर अंतराचे जलवाहिनीचे जाळे टाकताना कंत्राटदाराकडून मुख्य रस्त्यालगत व प्रभागात चक्क रस्ते खोदून जलवाहिनी टाकली जात आहे. खोदकाम केलेल्या मुख्य रस्त्यांची दुरुस्ती केली जात नाही, हे येथे विशेष. त्याचे परिणाम अकोलेकरांना भोगावे लागत आहेत. सोमवारी व मंगळवारी शहराच्या काही भागात झालेल्या पावसामुळे मुख्य रस्ते चिखलमय झाल्यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला.

आयुक्तांच्या आदेशाला ‘खो’!
रस्त्याचे खोदकाम करून जलवाहिनी टाकल्यानंतर सदर रस्त्याच्या दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या ‘एपी अ‍ॅण्ड जीपी’ कंपनीला मध्यंतरी मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी खडेबोल सुनावले होते. रस्त्यांची दुरुस्ती केल्यानंतरच पुढील कामाला मंजुरी देणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केल्यानंतरही कंपनीने मनमानी कारभार सुरूच ठेवल्याचे दिसून येत आहे. करारातील अटी व शर्तींचा सोयीनुसार फायदा उचलत कंपनीने सुरू केलेल्या कारभारासमोर तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त असलेली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची यंत्रणा हतबल ठरत आहे.

 

Web Title:  Mud on the streets; 'AP and GP' company's arbitrariness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.