खारपाणपट्ट्यातील तीन एकरातील मुगाचे पीक भुईसपाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:22 AM2021-08-28T04:22:58+5:302021-08-28T04:22:58+5:30
नया अंदुरा : परिसरातील पहिल्याच पावसात शेतकऱ्यांनी नगदी पीक मूग मोठ्या प्रमाणावर पेरणी केली असून, त्यानंतर दमदार पाऊस आल्याने ...
नया अंदुरा : परिसरातील पहिल्याच पावसात शेतकऱ्यांनी नगदी पीक मूग मोठ्या प्रमाणावर पेरणी केली असून, त्यानंतर दमदार पाऊस आल्याने पिके चांगली बहरली आहेत. मात्र वन्यप्राण्यांचा संचार वाढल्याने परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत.
खारपाणपट्ट्यातील नया अंदुरा येथील अल्पभूधारक शेतकरी कांतीलाल रामलाल गुप्ता व चंपालाल रामलाल गुप्ता यांच्या कारंजा रमजानपूर शेतशिवारात रानडुक्करांनी व हरणांच्या कळपाने हैदोस घालून तीन एकरावरील शेंगा अवस्थेतील मुगाचे पीक भुईसपाट केले. यात शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे . शेतकऱ्यांनी कर्ज काढून खते बी-बियाणे आणून पेरणी केली. आता दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे कांतीलाल गुप्ता व चंपालाल गुप्ता यांच्या तीन एकरातील मुगाचे शेंगा अवस्थेत असताना रानडुक्करांनी मोठे नुकसान गेले. वनविभागाने, कृषी सहाय्यक व तलाठी यांनी पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी. अशी मागणी होत आहे. दिवसेंदिवस रानडुक्करांसह वन्यप्राण्यांच्या वाढत्या हैदोसाने वनविभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु याबाबत वारंवार माहिती तसेच लेखी तक्रार देऊनही वनविभागाकडून दखल घेतली जात नाही. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
फोटो:
पिकांचे करावी लागते राखणदारी!
पेरणी व बियाणे यांच्या वाढत्या खर्चामुळे पाऊस असतानाही शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे रात्रभर राखण करावे लागत आहे. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नया अंदुरा व कारंजा रमजानपूर शेतशिवारातील शेतकरी करीत आहेत.