चिखलगाव येथील मुकेश पेंढारकर हत्याकांड; आरोपीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 03:45 PM2018-01-25T15:45:41+5:302018-01-25T15:49:26+5:30
अकोला: स्वत:च्या आईवर हल्ला करून तिला जखमी केल्यानंतर रूग्णालयात उपचारासाठी नेण्यास नकार देणाºया मिनी ट्रक चालकावर सुद्धा धारदार गुप्तीने वार करून त्याची हत्या करणारा आरोपी गोपाल जानराव सरप(३२) याला चौथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधिश व्ही.डी. केदार यांच्या न्यायालयाने गुरुवारी जन्मठेप आणि १0 हजार रूपये दंड, तसेच दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
अकोला: स्वत:च्या आईवर हल्ला करून तिला जखमी केल्यानंतर रूग्णालयात उपचारासाठी नेण्यास नकार देणाºया मिनी ट्रक चालकावर सुद्धा धारदार गुप्तीने वार करून त्याची हत्या करणारा आरोपी गोपाल जानराव सरप(३२) याला चौथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधिश व्ही.डी. केदार यांच्या न्यायालयाने गुरुवारी जन्मठेप आणि १0 हजार रूपये दंड, तसेच दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
मनोज पेंढारकर याने पातूर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार त्याचा भाऊ मुकेश मधुकर पेंढारकर(२६) हा मिनी ट्रकवर चालक म्हणून काम करीत होता. सात महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. २३ डिसेंबर २0१३ रोजी चिखलगाव येथील बसस्टँडवर मुकेश हा रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती मिळाली. मुकेश हा त्याच्या मिनी ट्रकमध्ये महावितरणचे काही साहित्य घेवून अकोल्याला जात होता. दरम्यान आरोपी गोपाल सरप याने त्याच्या जखमी आईला रूग्णालयात नेण्यासाठी मुकेशला विनवणी केली. परंतु मुकेशने त्याला नकार दिल्यामुळे संतप्त गोपालने त्याच्यावर गुप्तीने हल्ला केला. जखमी अवस्थेतच मुकेश पेंढारकर याला सर्वोपचार रूग्णालयात भरती केले. परंतु डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणात मनोज पेंढारकर याने पातूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी गोपाल सरप याच्याविरूद्ध भादंवि कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. तपासामध्ये आरोपी गोपालने मुकेशची हत्या करण्यापूर्वी स्वत:ची आई सुनंदा सरप आणि मित्र विलास पांडूरंग वानखडे यांच्यावरही गुप्तीने वार करून त्यांना जखमी केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्याकडून गुप्ती जप्त केली आणि भादंवि कलम ३0७, ३0४, आर्म अॅक्ट ४, २५ नुसार गुन्हा दाखल करून गोपालला अटक केली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने १९ साक्षीदार तपासले. चार साक्षीदार फितूर झाले. आरोपी गोपाल सरप याच्याविरूद्ध सबळ पुरावे मिळून आल्याने, न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आई व मित्रावर हल्ला प्रकरणात सुद्धा न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवित कलम ३0७ मध्ये ७ वर्षाचा सश्रम कारावास, पाच हजार रूपये दंड, न भरल्यास एक महिन्याचा अतिरिक्त कारावास आणि कलम ३२४ मध्ये एक वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रूपये दंड, न भरल्यास एक महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहाय्यक सरकारी विधिज्ञ मंगला ए. पांडे यांनी बाजु मांडली.