मुकुंद खैरे यांच्या कन्या शताब्दी खैरे यांचे कोरोनामुळे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2021 01:45 PM2021-05-02T13:45:59+5:302021-05-02T13:46:54+5:30
Shatabdi Khaire died due to corona : अॅड शताब्दी खैरे यांचे अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान २ में रोजी रात्री १ वाजता कोरोनाने निधन झाले.
मूर्तिजापूर : आंबेडकर चळवळीतील नेते अॅड. प्रा. मुकुंद खैरे यांची कन्या अॅड शताब्दी खैरे यांचे अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान २ में रोजी रात्री १ वाजता कोरोनाने निधन झाले. त्या २९ वर्षाच्या होत्या. दोन महिन्यांपूर्वी त्यांचे लग्न ठरले होते.
नागपूर उच्च न्यायालयात वकील असलेल्या शताब्दी खैरे या अनेक दिवसांपासून अकोला येथील खासगी रुग्णालयात कोरोनाशी झुंज देत होत्या. २ मे रोजी रात्री १ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली, प्रा. मुकुंद खैरे यांनी 'समाज क्रांती आघाडी' या सामाजिक संघटनेची मुहूर्तमेढ मूर्तिजापूरात रोवली, संघटना उभी करण्यासाठी 'शताब्दी' यांचा मोठा वाटा राहीला आहे. शताब्दी खैरे, एलएलएम सुवर्ण पदक प्राप्त होत्या. शताब्दी खैरे, नागपूर येथील उच्च न्यायालयात वकील म्हणून मागील ४ वर्षापासून कार्यरत होत्या. सर्वसामान्य लोकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सतत धडपड करीत असत. त्यांनी "बुध्दीष्ट लॉ" नावाचे एक कायद्याचे पुस्तक लिहिले आहे. शोषित समाजाची दखल घेण्यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे निवेदने केले. येवढेच नव्हे तर विविध आंदोलने करुन आदिवासीच्या शेतजमीन त्यांच्या नावावर करून देण्यास त्या यशस्वी झाल्या. सामाजिक न्याय हक्कासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार विरुद्ध कायदेशीर नोटिसा बजावून सर्वसामान्यांचे अधिकार व हक्क कायम ठेवण्यास यशस्वी ठरल्या. प्रा. मुकुंद खैरे, (समाज क्रांती आघाडी) याचे सोबत त्यांचे खांद्याला खांदा लावून, वयाच्या १०-१२ वर्षापासून शताब्दी यांनी काम केले. गत आठवड्यात कोरोनाने त्यांच्या आईचे कोरोनामुळे निधन झाले. वडील प्रा. मुकुंद खैरे हे सुद्धा कोरोना सोबत झूंज देत आहेत. शताब्दी च्या अकाली जाण्याने आंबेडकरी चळवळीतील एक तारा गमावल्याच्या शोक संवेदना अनेकांनी व्यक्त केल्या.