अनेक वीज कनेक्शन, आता बिल भरा एकाच क्लिकवर; महावितरणची नवी सुविधा 

By Atul.jaiswal | Published: May 29, 2024 03:33 PM2024-05-29T15:33:32+5:302024-05-29T15:34:20+5:30

राज्यामध्ये पोलीस, ग्रामविकास, पाणीपुरवठा अशा विविध सरकारी खात्यांना तसेच मोठ्या कंपन्यांना एका समस्येला तोंड द्यावे लागते.

Multiple electricity connections, now pay bills with a single click; New facility of Mahavitran  | अनेक वीज कनेक्शन, आता बिल भरा एकाच क्लिकवर; महावितरणची नवी सुविधा 

प्रतिकात्मक फोटो...

अकोला : राज्यात ठिकठिकाणी अनेक वीज कनेक्शन आणि त्यांच्या बिल भरण्याच्या वेगवेगळ्या तारखा अशी समस्या असलेल्या विविध सरकारी खात्यांसाठी आणि खासगी कंपन्यांसाठी महावितरणने सर्व कनेक्शनची बिले एकाच ठिकाणाहून ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध केली असून वेळेत बिल भरल्यास एक टक्का सूटही संबंधितांना मिळणार आहे.

राज्यामध्ये पोलीस, ग्रामविकास, पाणीपुरवठा अशा विविध सरकारी खात्यांना तसेच मोठ्या कंपन्यांना एका समस्येला तोंड द्यावे लागते. राज्यामध्ये त्यांच्या विविध कार्यालयांची विविध वीज कनेक्शन आणि त्यांची बिले भरण्याची वेगवेगळी अंतिम मुदत असल्याने आर्थिक तरतूद असूनही वेळेत बिले भरली नाहीत अशी समस्या येते. त्यामुळे दंड आणि व्याज द्यावे लागते. तसेच कधी कधी बिल भरले नसल्याने कनेक्शन तोडले जाते.

महावितरणने उपलब्ध केलेल्या सुविधेमुळे एकदा ऑनलाईन नोंदणी केली की संबंधित सरकारी खात्याला किंवा कंपनीला त्यांच्या मुख्यालयात बसून राज्यातील विविध ठिकाणच्या वीज कनेक्शनसाठी आलेली बिले आणि त्यांची अंतिम मुदत याची माहिती मिळेल. तसेच माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक बिल वेळेत भरल्यास एक टक्का सवलतही मिळेल. याखेरीज कागदी बिलाच्या ऐवजी इलेक्ट्रॉनिक बिल स्वीकारल्यामुळे प्रत्येक बिलामागे दहा रुपये सवलत आणि डिजिटल पेमेंट केल्यामुळे कमाल पाचशे रुपये सवलतही मिळेल. या सुविधेसाठी महावितरणच्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करता येईल किंवा नजिकच्या महावितरण कार्यालयात माहिती मिळेल.

किमान दहा वीज कनेक्शन गरजेचे
किमान दहा वीज कनेक्शन असलेला कोणताही सरकारी विभाग किंवा खासगी कंपनी याचा लाभ घेऊ शकतात. यामुळे त्यांना आर्थिक व्यवस्थापन करणे सोपे होईल, त्यांच्या अंतर्गत विविध कार्यालयात होणारा विजेचा वापर आणि त्यावर होणारा खर्च याची माहिती सहजपणे एकत्रित मिळेल. तसेच बिलाबाबत काही तक्रार असल्यास तीही सहजपणे ऑनलाईन करता येईल.
 

Web Title: Multiple electricity connections, now pay bills with a single click; New facility of Mahavitran 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.