अकोला जिल्हा परिषदेत ‘शिवसंग्राम’चे मुंडन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 05:02 PM2018-06-04T17:02:31+5:302018-06-04T17:02:31+5:30
अकोला : महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या बाळापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कार्यवाही होत नसल्याचा जाहीर निषेध करीत शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर सामुहिक मुंडन आंदोलन केले.

बाळापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांनी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी त्यांना त्वरित निलंबित करून त्यांच्या कृत्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्यावतीने २४ मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात केली होती.
बाळापूर पं.स.चे गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांनी केलेल्या विनयभंगाच्याप्रकरणी बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .अशा जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीकडून असे कृत्य अपेक्षित नव्हते, महिलांवर वाईट नजर ठेवणाºया अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचले गेले पाहिजे. या घटनेने शासनाची प्रतिमा मलीन झाली असून, या दोघांनाही तत्काळ निलंबित करावे, असे निवेदनात म्हटले होते. निवेदन दिल्यानंतरही गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्यांविरुद्ध कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे शिवसंग्रामचे युवक जिल्हाध्यक्ष अक्षय पाटील झटाले, निखिल बोरीकर, आनंद घोगरे व इतर कार्यकर्त्यांनी शनिवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर ठिय्या देऊन निषेध व्यक्त केला व सामुहिक मुंडन केले. येत्या सात दिवसांत कार्यवाही न झाल्यास शिवसंग्रामच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. संदीपदादा पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेल्या या आंदोलनात ज्ञानेश्वर शेळके, धनंजय माळी, आकाश घाटोळ, अंकुश मोटे, सुशांत लांडगे, हरिष जंगम, अनिकेत शेंडे, भूषण पाटील, मयुरेश हुशे, पवन पल्हाडे, दीपक प्राणजळे, आशुतोष बोधडे, ओम जऊळकार, शुभम लोटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.