अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:35 PM2019-06-22T12:35:08+5:302019-06-22T12:35:30+5:30
अकोला: अतिक्रमण विभागात निर्माण झालेल्या बेबंदशाहीला आळा घालण्याच्या उद्देशातून महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी शुक्रवारी चार मानसेवी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला.
अकोला: अतिक्रमण विभागात निर्माण झालेल्या बेबंदशाहीला आळा घालण्याच्या उद्देशातून महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी शुक्रवारी चार मानसेवी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला. यामध्ये मानसेवी सुरक्षारक्षक विनोद वानखडे यांची सेवा समाप्त करण्यात आली असून, राजेंद्र टापरे, विजय बडोणे व नरेश बोरकर यांना सेवेमध्ये खंड देण्यात आला.
मुख्य रस्त्यांवरील लघू व्यावसायिक, फेरीवाले यांच्यावर कारवाई दरम्यान भेदभाव करणे, मर्जीतल्या व्यावसायिकांना मोकाट सोडून काही व्यावसायिकांजवळून मोठ्या प्रमाणात हप्ता वसूल करण्याचे कारनामे मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून सुरू होते. या प्रकारामुळे शहरात सर्वत्र अतिक्रमणाची समस्या निर्माण झाली आहे. या समस्येला वैतागलेल्या अकोलेकरांनी थेट आयुक्तांकडे तक्रारी केल्याची माहिती आहे. ही बाब गांभीर्याने घेत आयुक्त संजय कापडणीस यांनी अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या पुनर्गठनाचा निर्णय घेत कारवाईचा दंडुका उगारला आहे. या विभागात कार्यरत सर्व मानसेवी सुरक्षारक्षक, (माजी सैनिक) यांच्यासह मानसेवी सुरक्षारक्षक विनोद वानखडे यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला. तसेच मानसेवी कर्मचारी राजेंद्र टापरे, विजय बडोणे व नरेश बोरकर यांना सेवेमध्ये खंड देण्यात आला.