मनपा कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मनपा आयुक्त रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 04:52 PM2020-04-19T16:52:20+5:302020-04-19T16:52:38+5:30
मनोबल उंचावण्यासाठी खुद्द मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी पुढाकार घेतल्याचे चित्र आहे.
अकोला: महापालिकेच्या उत्तर झोनमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पाहून या भागामध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी करणाºया मनपा कर्मचाऱ्यांचे व आशा वर्कर यांचे मनोबल उंचावण्यासाठी खुद्द मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी पुढाकार घेतल्याचे चित्र आहे. प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या भागांमध्ये आयुक्त कापडणीस परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जात असल्याने मनपा कर्मचाºयांना बळ मिळत असल्याची चर्चा आहे.
जीवघेण्या कोरोना व्हायरसचा पहिला ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण ७ एप्रिल रोजी शहरातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये बैदपुरा भागात आढळून आला. त्यानंतर ८ एप्रिल रोजी कोरोनाचा दुसरा ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण प्रभाग क्रमांक १२ मध्ये अकोट फैल परिसरात आढळून आला होता. यादरम्यान प्रभाग क्रमांक ११ मधील कोरोना बाधित रुग्णाच्या कुटुंबातील आणखी तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यात भरीस भर प्रभाग क्रमांक ११ मधीलच ताजनापेठ परिसरातील एका ४५ वर्षांच्या इसमाला कोरोनाची लागण होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर याच मृतकाच्या कुटुंबातील आणखी दोन सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. अर्थात, आज रोजी प्रभाग क्रमांक ११ मध्ये एकूण सात लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालाद्वारे स्पष्ट झाले आहे. या भागातील संपूर्ण नागरिकांची दैनंदिन आरोग्य तपासणी करण्यासाठी मनपाची यंत्रणा कामाला लागली आहे. ८ एप्रिल रोजी बैदपुरा परिसरात सर्वेक्षणासाठी गेलेल्या मनपाच्या पथकांना स्थानिक रहिवाशांनी घेराव घालून त्यांच्याकडील कागदपत्रे हिसकावून घेतल्याची घटना घडली होती. असाच प्रकार अकोट फैल परिसरातील अकबर प्लॉटमध्ये घडला. त्यामध्ये आशा वर्कर यांना धक्काबुक्की करण्यात आली. ताजनापेठ परिसरातील कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर व परिसरातील रहिवाशांचा पूर्वानुभव लक्षात घेता अशा भागांमध्ये मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी स्वत: जाऊन पाहणी करण्याचा निर्णय घेतला. आयुक्तांच्या या निर्णयामुळे प्रतिबंधित क्षेत्रात आरोग्य तपासणीसाठी जाणाºया महापालिकेच्या पथकातील कर्मचाºयांना बळ मिळत असल्याची भावना अनेक कर्मचाºयांनी व्यक्त केली.
नगरसेवक फिरकलेच नाहीत!
नाला सफाई असो वा प्रभागांमधील अंतर्गत रस्त्याची झाडपूस किंवा इतर कोणत्याही किरकोळ कारणांसाठी धाऊन जाणारे नगरसेवक प्रतिबंधित क्षेत्रामध्ये फिरकतही नसल्याची या परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा आहे.उत्तर झोनमधील प्रभाग क्रमांक दोन व प्रभाग क्रमांक ११ मध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर संबंधित नगरसेवकांनी साधी विचारपूसही केली नसल्याची नाराजी स्थानिक रहिवासी व्यक्त करीत आहेत.
आम्ही तुमच्यासाठीच; सहकार्य करा!
कोरोना विषाणूची लागण एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे होते. एकाच ठिकाणी उभे राहून घोळक्याने चर्चा केल्यानेही कोरोनाचा संसर्ग होतो. हा धोका टाळण्यासाठी नागरिकांना घराबाहेर निघण्यास मनाई केली आहे. तसेच कोरोना बाधित रुग्णांच्या परिसरात या संसर्गाचा धोका लक्षात घेता त्या भागातील नागरिकांची दैनंदिन आरोग्य तपासणी केली जात आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठीच आहोत, आम्हाला सहकार्य करा, असे आवाहन मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी केली आहे.