शहराच्या मूलभूत सुविधांवर राहणार भर - मनपा आयुक्त संजय कापडणीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 02:05 PM2018-12-29T14:05:18+5:302018-12-29T14:06:07+5:30
अकोला: अकोला महानगरपालिकेच्या आयुक्तपदी रुजू होताच, अकोलेकरांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर राहणार असल्याची ग्वाही नवनियुक्त आयुक्त संजय कापडणीस यांनी शुक्रवारी दिली.
अकोला: अकोला महानगरपालिकेच्या आयुक्तपदी रुजू होताच, अकोलेकरांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर राहणार असल्याची ग्वाही नवनियुक्त आयुक्त संजय कापडणीस यांनी शुक्रवारी दिली. महापालिका प्रशासनाची ही नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय, शहरातील विकास कामे हे समन्वयातून पूर्ण करणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून शहरात विविध विकास कामे सुरू आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अमृत योजने अंतर्गत पाणीपुरवठा योजना, भूमिगत गटार योजनेच्या कामांचा समावेश आहे. अकोलकरांकडून वसूल करण्यात येणाऱ्या कराच्या बदल्यात त्यांना प्राथमिक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही मनपा प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी नागरिकांनीसुद्धा थकीत कराचा भरणा करण्याची गरज आहे. सद्यस्थितीत शहरातील रस्ते, एलईडी पथदिव्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. या सर्व कामांचा आढावा घेऊन त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आयुक्त कापडणीस यांनी स्पष्ट केले.
समन्वयातून साधणार विकास!
प्रत्येक शहरातील विकास कामे करण्याची पद्धत निरनिराळी राहते. यापूर्वी जळगाव मनपात काम केल्याचा या ठिकाणी निश्चितच फायदा होणार. शिवाय, विकास कामांच्या मुद्यावर सर्वांसोबत समन्वय साधल्या जाईल, असे आयुक्त संजय कापडणीस यांनी सांगितले.
नियमबाह्य कामांना थारा नाही
महापालिका प्रशासनाची गाडी रुळावर टिकावी, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच नियमबाह्य कामांना अजिबात थारा दिला जाणार नाही.