मनपा आयुक्तांच्या क्षेत्रीय अधिकारी, अभियंत्यांना कानपिचक्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 03:32 PM2018-05-29T15:32:22+5:302018-05-29T15:32:22+5:30
अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाºया मनपाच्या क्षेत्रीय अधिकाºयांसह नगर रचना विभागातील कनिष्ठ अभियंत्यांच्या कार्यप्रणालीचा सोमवारी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी खरपूस समाचार घेत संबंधितांचे चांगलेच कान उपटले.
अकोला: मागीलवर्षी बांधण्यात आलेल्या शहरातील इमारतींचे मोजमाप घेऊन अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाºया मनपाच्या क्षेत्रीय अधिकाºयांसह नगर रचना विभागातील कनिष्ठ अभियंत्यांच्या कार्यप्रणालीचा सोमवारी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी खरपूस समाचार घेत संबंधितांचे चांगलेच कान उपटले. त्यांनी झोन अधिकाºयांना कारवाईसाठी आता १५ दिवसांचा ‘अल्टीमेटम’ दिला.
मागील दोन वर्षांच्या कार्यकाळात शहरात अनधिकृत बांधकामांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. या प्रकरणाची दखल घेत महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी २०१७-१८ मध्ये बांधण्यात आलेल्या इमारतींचे मोजमाप घेऊन अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश अडीच महिन्यांपूर्वी क्षेत्रीय अधिकाºयांना दिले होते. त्यासाठी झोन कार्यालयात कार्यरत नगर रचना विभागातील कनिष्ठ अभियंत्यांना मोजमाप घेऊन कारवाई करण्याचे निर्देश होते. राज्य शासनाने २०१५ पर्यंतच्या इमारती नियमानुकूल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर संबंधित इमारतींना ‘हार्डशिप अॅण्ड कॅम्पाउंडींग’ची नियमावली लागू केली, तसेच इमारतींच्या अवाजवी बांधकामाला आळा घालण्यासाठी आॅटोडिसीआर प्रणाली लागू केली. आॅटोडिसीआर प्रणालीद्वारे नकाशा मंजूर केल्यानंतरही प्रत्यक्षात इमारतींचे बांधकाम नियमापेक्षा जास्त होत असल्याचे चित्र आहे. या प्रकाराची महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गंभीर दखल घेत पहिल्या टप्प्यात २०१७-१८ मध्ये उभारलेल्या इमारतींचे मोजमाप घेऊन बांधकाम जास्त आढळणाºया इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश क्षेत्रीय अधिकारी, नगर रचना विभागाला दिले होते. मागील अडीच महिन्यांपासून क्षेत्रीय अधिकारी, नगर रचना विभागातील कनिष्ठ अभियंत्यांनी काय दिवे लावले, याचा आयुक्त वाघ यांनी सोमवारी आढावा घेतला असता, संबंधित अधिकारी व कनिष्ठ अभियंता हवेत गोळीबार करीत असल्याचे निदर्शनास येताच जितेंद्र वाघ यांनी खरपूस समाचार घेतला.
झोन अधिकाºयांना कर्तव्याचा विसर
नगर रचना विभागातील कनिष्ठ अभियंत्यांकडून इमारतींचे मोजमाप व पुढील कारवाई करून घेण्याची जबाबदारी झोन अधिकाºयांची होती. याठिकाणी झोन अधिकाºयांना कर्तव्याचा विसर पडल्याचे समोर आले. या मुद्यावरून आयुक्त वाघ यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.
बिल्डरांना वाचविण्याचा खटाटोप का?
शहराच्या कानाकोपºयात कमर्शियल कॉम्प्लेक्स, रहिवासी इमारती, डुप्लेक्सचे मोठ्या प्रमाणात निर्माण कार्य सुरू आहेत. लहान-मोठ्या झोपड्या हटवताना झोन अधिकारी कायद्याचे पालन करताना दिसतात. नियमांना बासनात गुंडाळून इमारती उभारणाºया बांधकाम व्यावसायिकांना वाचविण्यासाठी मनपातील संबंधित अधिकारी खटाटोप करीत असल्याचे चित्र पहावयास मिळते.
मे महिन्याचे मानधन कपात
शहरातील चारही झोनमध्ये २०१७-१८ मध्ये उभारलेल्या इमारतींचे मोजमाप घेऊन त्यांना नोटीस जारी करणे, नियमापेक्षा जास्त बांधकाम असणाºया इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिले होते. कनिष्ठ अभियंत्यांनी सादर केलेली आकडेवारी दिशाभूल करणारी आणि फसवी असल्याचे लक्षात येताच आयुक्तांनी सदर अभियंत्यांचे मे महिन्याचे मानधन कपात करण्याचा निर्णय घेतला.