अकोला शहराच्या साैंदर्यीकरणासाठी हाेर्डिंग्जच्या संख्येवर नियंत्रण मनपा आयुक्तांचा निर्णय; ७६ हाेर्डिंग्जसाठी निविदा जारी
By आशीष गावंडे | Published: September 28, 2022 02:31 PM2022-09-28T14:31:43+5:302022-09-28T14:32:15+5:30
Akola News: उत्पन्नवाढीच्या सबबीखाली महापालिका प्रशासनाने अधिकृत हाेर्डिंग्जच्या संख्येत वाढ केली हाेती. यात भरीस भर अनधिकृत हाेर्डिंग्जचा सुळसुळाट झाल्यामुळे शहराच्या साैंदर्यीकरणाची अक्षरश: वाट लागल्याचे चित्र आहे
- आशिष गावंडे
अकाेला - उत्पन्नवाढीच्या सबबीखाली महापालिका प्रशासनाने अधिकृत हाेर्डिंग्जच्या संख्येत वाढ केली हाेती. यात भरीस भर अनधिकृत हाेर्डिंग्जचा सुळसुळाट झाल्यामुळे शहराच्या साैंदर्यीकरणाची अक्षरश: वाट लागल्याचे चित्र आहे. ही बाब ध्यानात घेता मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी अधिकृत हाेर्डिंग्जची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल ६० हाेर्डिंग्ज कमी करीत ७६ हाेर्डिंग्जसाठी निविदा प्रसिध्द केली आहे.
मनपा प्रशासनाने शहरात जाहिरातींसाठी मोक्याच्या जागा निश्चित केल्या आहेत. या जागांच्या व्यतिरिक्त शहरात अनधिकृत होर्डिंग, बॅनरचा सुळसुळाट झाला आहे. यामध्ये काही जाहिरात कंपन्यांसह प्रामुख्याने विविध पक्षांतील राजकारण्यांच्या चेलेचपाट्यांचा समावेश असल्याचे दिसून येते. शहरातील गल्लीबोळात अनधिकृत होर्डिंगचे पेव फुटले आहे. याप्रकाराकडे महापालिकेच्या बाजार-परवाना व अतिक्रमण विभागाचे साेयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. अनधिकृत फलक, बॅनरमुळे महापालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून, शहर विद्रूप करणाऱ्या हाेर्डिंग्जचा व त्याचा वापर करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाइचे संकेत आहेत. दरम्यान, प्रशासनाला अधिकृत ७६ हाेर्डिंग्जपासून वर्षाकाठी एक काेटी रुपये उत्पन्नाची अपेक्षा आहे. बक्कळ कमाइचे साधन असलेल्या या व्यवसायात आर्थिक गुंतवणूकीसाठी अनेक एजन्सी संचालकांची लगबग सुरु झाली आहे.
...म्हणून हाेर्डिंग्जची संख्या केली कमी
शहराच्या सौंदर्यीकरणाची वाट लावणाऱ्या अधिकृत हाेर्डिंग्ज व फलकांना जागा दिसेल त्याठिकाणी परवाना देण्याचे काम यापूर्वी प्रशासनाने केले आहे. प्रशासनाच्या मिळमिळीत भूमिकेचा काही जाहिरात एजन्सी संचालकांनी साेयीनुसार वापर करुन घेतला. ही बाब आयुक्त द्विवेदी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बॅनर,फलकांची संख्या निश्चित करण्यासाठी लाेटस् एन्टरप्रायजेस नामक सल्लागार एजन्सीची नियुक्ती केली. एजन्सीचा अहवाल प्राप्त हाेताच थेट अधिकृत हाेर्डिंग्जची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मध्यरात्री उभारले खांब!
मनपाने निश्चित केलेल्या जागेव्यतिरिक्त काही व्यावसायिकांनी मुख्य रस्त्यांलगत नियमबाह्यपणे खांब उभारले. यामध्ये प्रामुख्याने अशाेक वाटिका ते जिल्हा सामान्य रुग्णालयाचे प्रवेशद्वार, जिल्हाधिकारी कार्यालय चाैक, अशाेक वाटिका ते नेहरू पार्क चाैक, निमवाडी चाैक ते गुरांचा बाजार रस्ता, नेहरू पार्क ते महापारेषण कार्यालय, सिव्हिल लाइन चाैक ते रतनलाल प्लाॅट चाैक आदी मुख्य रस्त्यांलगत मध्यरात्रीच्या सुमारास खांब उभारण्यात आले. असे खांब हुडकून काढून ते जप्त करण्याची कारवाइ प्रशासन करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.