मुख्य रस्त्यालगतच्या अतिक्रमणावर मनपाकडून कारवाईचा सपाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 12:17 PM2019-12-03T12:17:29+5:302019-12-03T12:18:27+5:30
काही दिवसांपासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अतिक्रमण हटविण्याचा सपाटा लावल्याचे चित्र दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: मुख्य बाजारपेठेत अतिक्रमणाच्या वाढत्या समस्येमुळे अकोलेकरांच्या नाकीनऊ आल्याची परिस्थिती आहे. वैतागलेल्या अकोलेकरांची समस्या लक्षात घेता मागील काही दिवसांपासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अतिक्रमण हटविण्याचा सपाटा लावल्याचे चित्र दिसत आहे. अतिक्रमण विभाग प्रमुख अनिल बिडवे यांनी सोमवारी सिंधी कॅम्प, खदान ते कौलखेड चौक, तुकाराम चौक, अग्रसेन ते दुर्गा चौक मार्गालगत दुकानदारांनी बांधलेले पक्के ओटे, टिनाचे अतिक्रमित शेड, चायनिज खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर कारवाई करीत अतिक्रमकांना हुसकावून लावले.
शहरातील मुख्य बाजारपेठ व परिसराला लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांनी गराडा घातला आहे. मनपाच्या अतिक्र मण निर्मूलन पथकाचा धाक नसल्यामुळे फेरीवाले चक्क मुख्य रस्त्यांवर बाजार मांडत असल्याची परिस्थिती आहे. यामध्ये प्रामुख्याने रेडीमेड ड्रेस विक्रेते, खाद्यपदार्थांची विक्री करणारे तसेच फळ विके्रत्यांचा समावेश आहे. शहराची संपूर्ण बाजारपेठ गांधी रोड, टिळक रोड, खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉजपर्यंतच्या मार्गावर स्थिरावली आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत कमर्शियल कॉम्पलेक्समधील दुकाने, प्रतिष्ठानांच्या नाकावर टिच्चून लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांनी रस्त्यांलगत दुकाने थाटली आहेत. अतिक्रमकांच्या वाढत्या संख्येचा परिणाम बाजारपेठेवर होत आहे. नागरिकांना रस्त्यावर धड पायी चालणे मुश्कील झाले आहे. यासंदर्भात मनपा प्रशासनासह सत्ताधाऱ्यांकडे प्रचंड तक्रारी होत आहेत. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणाचा सफाया करण्याचे आदेश अतिक्रमण निर्मूलन पथकाला दिले आहेत.
त्यानुषंगाने सोमवारी शहराच्या चारही झोन अंतर्गत येणाºया मुख्य रस्त्यालगत थाटलेले अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई मनपाचे नगर सचिव तथा अतिक्रमण विभाग प्रमुख अनिल बिडवे, सहायक अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा, विठ्ठल देवकते, मुलसिंग चव्हाण, चंद्रशेखर इंगळे यांसह सुरक्षा रक्षकांनी केली.