पालकमंत्री बच्चू कडूंच्या आढावा बैठकीचा महापालिकेने घेतला धसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 01:28 PM2020-01-15T13:28:47+5:302020-01-15T13:28:52+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेणार आहेत.

Municipal Corporation frightend of review meeting of Guardian Minister Bachu Kadu | पालकमंत्री बच्चू कडूंच्या आढावा बैठकीचा महापालिकेने घेतला धसका

पालकमंत्री बच्चू कडूंच्या आढावा बैठकीचा महापालिकेने घेतला धसका

Next

अकोला: आपल्या खास शैलीने कामचुकार अधिकारी-कर्मचाºयांच्या उरात धडकी भरविणाºया राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा जाताच प्रशासकीय यंत्रणांमधील भ्रष्ट प्रवृत्तीच्या अधिकाºयांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पालकमंत्री पदावर विराजमान झालेल्या ना. बच्चू कडू यांचे शहरात उद्या बुधवारी प्रथमच आगमन होत असून, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीचा मनपा प्रशासनाने चांगलाच धसका घेतल्याचे चित्र मंगळवारी पाहावयास मिळाले. आयुक्त संजय कापडणीस यांनी मंगळवारी घेतलेल्या आढावा बैठकीत अधिनस्त अधिकाºयांना सविस्तर माहिती सादर करण्याचा इशारा दिल्याची माहिती आहे.
राज्यात महाविकास आघाडीमध्ये अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागून त्यांच्याकडे अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. ना. बच्चू कडू त्यांच्या आक्रमक आंदोलनासाठी ओळखल्या जातात. सर्वसामान्यांच्या समस्या निकाली काढताना ते अनेकदा संबंधितांच्या कानशिलात लगावत असल्याचेही दिसून आले आहे. साहजिकच, त्यांच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तडकाफडकी निकाली निघत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर उद्या बुधवारी ना. कडू यांचे शहरात आगमन होत आहे. दुपारी २ वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेणार आहेत. यावेळी मनपा प्रशासनाच्या कामकाजावरही चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.


रात्री उशिरापर्यंत कामकाज
पालकमंत्री बच्चू कडू यांच्या आढावा बैठकीचा धसका घेतलेल्या महापालिकेच्या विविध विभागातील कामकाज रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यामध्ये प्रामुख्याने अनधिकृत फोर-जी केबल टाकून मनपा प्रशासनाला सुमारे ३० ते ३२ कोटी रुपयांनी चुना लावणाºया मोबाइल कंपन्यांची माहिती जमा क रण्यात आली. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थींच्या घराचे नकाशे निकाली काढण्याची लगबग नगररचना विभागात सुरू होती. कोट्यवधींच्या शौचालय घोळाचा तपास करणाºया स्वच्छता विभागासह अमृत योजनेची जबाबदारी असलेल्या जलप्रदाय विभागातही माहिती जमा करण्याची लगबग सुरू असल्याचे चित्र होते.


मनपा आयुक्तांनी घेतला आढावा
पालकमंत्री ना. बच्चू कडू जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आढावा घेतील. त्यानुषंगाने मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी मंगळवारी त्यांच्या दालनात विभाग प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन केले होते. मनपा अधिकाऱ्यांनी इत्थंभूत माहिती घेऊन पालकमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. माहिती सादर करताना काही नियमबाह्य बाब समोर आल्यास संबंधित अधिकाºयांनी कारवाईसाठी तयार राहण्याचा इशारा आयुक्तांनी दिल्याची माहिती आहे.

 

Web Title: Municipal Corporation frightend of review meeting of Guardian Minister Bachu Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.