चार शिकवणी वर्गांना महापालिकेने लावले ‘सील’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 12:33 PM2019-06-11T12:33:26+5:302019-06-11T12:33:33+5:30
अकोला : सुरत येथील एका शिकवणी वर्गाच्या वरच्या मजल्यावर आग लागल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले होते.
अकोला : सुरत येथील एका शिकवणी वर्गाच्या वरच्या मजल्यावर आग लागल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले होते. या शिकवणी वर्गामध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा बचावसुद्धा करता आला नाही. याच पृष्ठभूमीवर महापालिकेच्या अग्निशमन दलाने सोमवारी शहरातील शिकवणी वर्गांची पाहणी करून चार शिकवणी वर्गांना अग्निशमन यंत्रणा न बसविल्यामुळे ‘सील’ लावले.
सुरत येथील घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, महापालिकेच्या अग्निशमन दलाने शहरातील सर्व खासगी शिकवणी वर्ग चालविणाऱ्या संचालकांना आठवडाभरापूर्वीच नोटीस पाठविल्या होत्या; परंतु नोटीस पाठवून शिकवणी वर्ग संचालकांनी कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे सोमवारी महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने शहरातील शिकवणी वर्गांची पाहणी केली. पाहणीदरम्यान शहरातील प्रा. अजय कुटे यांचे आकाशवाणी पाठीमागील कुटे अॅकेडमी, तोष्णीवाल ले-आउटमधील प्रा. प्रशांत देशमुख यांचे सरस्वती कोचिंग क्लासेस, प्रा. अजरांबर गावंडे यांचे युनिक कोचिंग क्लासेस आणि प्रा. मुकुंद पाध्ये यांच्या आकाश एज्युकेशन कोचिंग क्लासेसच्या इमारती, हॉलमध्ये कोणत्याच प्रकारची अग्निशमन यंत्रणा नसल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता, महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलाचे अधिकारी रमेश ठाकरे व प्रभारी अग्निशमन सुरक्षा अधिकारी प्रकाश फुलउंबरकर यांच्या नेतृत्वात या चारही शिकवणी वर्गांना ‘सील’ लावले. यासंदर्भात प्रा. पाध्ये यांना संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. तसेच प्रा. गावंडे, प्रा. अजय कुटे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांचे मोबाइल संपर्क क्षेत्राच्या बाहेर होते. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.
इतरही शिकवणी वर्गांवर लवकरच कारवाई!
अनेक शिकवणी वर्ग संचालकांनी विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना केलेल्या नाहीत. इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणासुद्धा बसविलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलाने सर्व ६४ शिकवणी वर्गांना नोटीस पाठवून डेडलाइन दिली होती. ही डेडलाइन संपल्यानंतरही एकाही शिकवणी वर्ग संचालकाने अग्निशमन यंत्रणा बसविली नाही. त्यामुळे महापालिका अग्निशमन दलाच्यावतीने ही कारवाई सुरूच राहणार आहे.
शिकवणी वर्गामध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्यामुळे मनपा अग्निशमन विभागाने कारवाई केली. कारवाईला आमचा विरोध नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला आम्ही नेहमीच प्राधान्य दिले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी लवकरच फायर आॅडिट करून अग्निशमन यंत्रणा उभारू.
-प्रा. प्रशांत देशमुख, संचालक.