नागरिकांच्या विराेधासमाेर झुकली मनपा;जलकुंभासाठी जागा सापडेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:19 AM2021-03-05T04:19:02+5:302021-03-05T04:19:02+5:30
केंद्र शासनाच्या 'अमृत' अभियान अंतर्गत संपूर्ण शहरातील जलवाहिनीचे जाळे बदलणे,महान धरण ते अकोला शहरापर्यंत मुख्य जलवाहिनीचे जाळे टाकने तसेच ...
केंद्र शासनाच्या 'अमृत' अभियान अंतर्गत संपूर्ण शहरातील जलवाहिनीचे जाळे बदलणे,महान धरण ते अकोला शहरापर्यंत मुख्य जलवाहिनीचे जाळे टाकने तसेच नवीन आठ जलकुंभ उभारणीच्या कामासाठी मनपाने 'एपीअँडजीपी' कंपनीला कार्यादेश दिले. कंपनीने सात जलकुंभ उभारले असताना जुने शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मैदानलगतच्या जागेवरील जलकुंभाचे बांधकाम रखडल्याचे समाेर आले आहे. जलकुंभाच्या उभारणीला स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध केल्यामुळे मनपाच्या जलप्रदाय विभागाने अक्षरश: माघार घेतल्याची माहिती आहे. स्थानिक रहिवाशांच्या विरोधासमोर हतबल ठरलेल्या मनपा प्रशासनाने जलकुंभासाठी पर्यायी जागेचा शाेध सुरु केला आहे.
जागेचा शाेध लागेना!
पाणीपुरवठ्यासारख्या अत्यावश्यक सेवेच्या मुद्यावर मनपा प्रशासनाने ठाम असणे क्रमप्राप्त असताना स्थानिक रहिवाशांच्या विराेधासमाेर नतमस्तक हाेण्याची ही मनपाच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. या भागातील नागरिक मनपा कर्मचाऱ्यांना शिवीगाळ,धाकदपट करीत असताना प्रशासनाने कारवाइचा बडगा का उगारला नाही,असा सवाल उपस्थित हाेत आहे. आता पर्यायी जलकुंभासाठी मनपाला जुने शहरात जागा सापडत नसल्याची परिस्थिती आहे.
...तर ‘डिजाइन’मध्ये बदल
मनपाची हद्दवाढ हाेण्यापूर्वी शहरात एकूण १३ जलकुंभ हाेते. त्यामध्ये ‘अमृत’ याेजने अंतर्गत आठ जलकुंभांची भर पडली असून हद्दवाढ क्षेत्रातील आठ जलकुंभ अशा एकूण २९ जलकुंभांद्वारे पाणीपुरवठा केला जाइल. ‘अमृत’मध्ये जलवाहिनीचे जाळे टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात असून जुने शहरातील डाॅ.आंबेडकर मैदानालगत प्रस्तावित जलकुंभासाठी जलवाहिनीची ‘डिजाइन’तयार करण्यात आली हाेती. आता या ‘डिजाइन’मध्ये बदल करावा लागणार असल्याने जुने शहरवासियांना विलंबाने पाणीपुरवठा हाेइल,यावर शिक्कामाेर्तब झाले आहे.
मनपाच्या भूमिकेकडे लक्ष
महापालिका आयुक्त निमा अराेरा यांच्याकडून अकाेलेकरांना अपेक्षा आहेत. परंतु त्या प्रदिर्घ रजेवर असून आयुक्तपदाचा अतिरिक्त प्रभार उपायुक्त डाॅ.पंकज जावळे यांच्याकडे साेपवला आहे. यावर डाॅ.जावळे काय निर्णय घेतात,याकडे लक्ष लागले आहे.