रस्त्यालगत दुकाने; मनपाने उपसले कारवाईचे हत्यार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 01:48 PM2019-05-17T13:48:32+5:302019-05-17T13:48:57+5:30
प्रशासनाने कारवाईचे हत्यार उपसताच गांधी रोडवरील लघू व्यावसायिकांची धावाधाव सुरू झाली आहे.
अकोला: मनपा प्रशासनाने मुख्य रस्त्यांवरील लघू व्यावसायिक व फेरीवाल्यांना गणेश घाटावर पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्यानंतरही संबंधित व्यावसायिकांनी रस्त्यांवरच दुकाने थाटली होती. लघू व्यावसायिक व फेरीवाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या हातावर तुरी दिल्याची बाब गांभीर्याने घेत प्रशासनाने कारवाईचे हत्यार उपसताच गांधी रोडवरील लघू व्यावसायिकांची धावाधाव सुरू झाली आहे. गुरुवारी बोटावर मोजता येणाºया लघू व्यावसायिक व फेरीवाल्यांनी गणेश घाटावर जाणे पसंत केल्याचे चित्र दिसून आले.
शहरातील मुख्य बाजारपेठ व परिसराला लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांनी गराडा घातला आहे. मनपाच्या अतिक्र मण निर्मूलन पथकाचा कवडीचाही धाक नसल्यामुळे लघू व्यावसायिकांनी चक्क मनपाच्या आवारभिंतीलगत दुकाने थाटली. यामध्ये प्रामुख्याने रेडीमेड ड्रेस विक्रेते, खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांचा समावेश आहे. शहराची संपूर्ण बाजारपेठ गांधी रोड, टिळक रोड, खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉजपर्यंतच्या मार्गावर स्थिरावली आहे. अतिक्रमणामुळे नागरिकांना रस्त्यावर धड पायी चालणे मुश्कील झाले आहे. या समस्येवर प्रभावी तोडगा काढण्याच्या उद्देशातून महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी फेरीवाले व लघू व्यावसायिकांना मोर्णा नदीच्या काठावरील मुख्य गणेश घाटावर पर्यायी जागा देण्याचा निर्णय घेतला. अतिक्रमकांची संख्या निश्चित केल्यानंतर लघू व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाºयांसोबत वारंवार सकारात्मक चर्चा केली; परंतु संघटनेच्या पदाधिकाºयांनी मनपाच्या प्रस्तावाकडे पाठ फिरविल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. गुरुवारी गांधी रोड, खुले नाट्यगृह मार्गावरील अतिक्रमकांना हुसकावून लावण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी काही लघू व्यावसायिकांनी गणेश घाटावर जाणे पसंत केल्याचे दिसून आले.
...तरीही अतिक्रमण कायमच!
शहरातील मुख्य रस्त्यांवर थाटल्या जाणाºया अतिक्रमणामुळे सर्वसामान्य अकोलेकर त्रस्त आहेत. यामध्ये प्रामुख्याने गांधी चौक, गांधी रोड चौपाटी, मनपाची आवारभिंत, जैन मंदिर परिसर, खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉज परिसर, मोहम्मद अली मार्ग, ताजनापेठ चौक, टॉवर चौक आदींचा समावेश आहे. गुरुवारी अतिक्रमण विभागाने कारवाई केल्यानंतरही जैन मंदिर परिसर, काश्मीर लॉज परिसरातील अतिक्रमण कायमच असल्याचे चित्र होते.
लघू व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यांनी पर्यायी जागेचा वापर न केल्यास त्यांच्यावरील कारवाई सुरूच राहील.
-संजय कापडणीस, आयुक्त, मनपा.