मनपा शिक्षकांच्या बदल्यांचा पोळा फुटला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:20 PM2019-06-24T12:20:15+5:302019-06-24T12:20:29+5:30
अकोला: महापालिकेच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांवरील शिक्षकांच्या तात्पुरत्या स्वरूपात बदल्या करण्यात आल्या आहेत.
अकोला: महापालिकेच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांवरील शिक्षकांच्या तात्पुरत्या स्वरूपात बदल्या करण्यात आल्या आहेत. या दोन्ही माध्यमातील १९ शिक्षकांच्या बदल्यांना मनपा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. संबंधित शाळेवरील यंत्रणा सुरळीत चालावी, यानुषंगाने पर्यायी शिक्षकांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आहे.
महापालिकेच्या एकाच शाळेत चक्क वीस ते बावीस वर्षे ठाण मांडून बसणाऱ्या शिक्षकांच्या हेकेखोर व मनमानी कारभारामुळे शिक्षणप्रणालीचा बोजवारा उडाल्याचे चित्र होते. मनपातील पदाधिकाऱ्यांचा वरदहस्त आणि शिक्षक संघटनेतील काही दलालांना हाताशी धरून शिक्षकांकडून बदल्यांचा खेळ सुरू होता. या प्रकाराला मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी चाप लावत एकाच शाळेवर ठिय्या दिलेल्या शिक्षकांच्या बदल्या केल्या. पहिल्या टप्प्यात १२ वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ एकाच शाळेवर व्यतित करणाºया शिक्षकांचा समावेश होता. दुसºया टप्प्यातील बदली प्रक्रियेत पाच वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ घालविणाºया शिक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. तत्कालीन आयुक्त जितेंद्र वाघ यांनी हीच पद्धत कायम ठेवत संबंधित शाळेवर तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ झाला असेल आणि प्रशासनाला त्या-त्या शिक्षकांच्या बदलीची गरज भासल्यास बदली करण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान,बहुतांश शिक्षकांना तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ होत नसल्याने जितेंद्र वाघ यांनी काही शिक्षकांच्या बदलीचे प्रस्ताव फेटाळून लावले होते. यंदा मर्जीतल्या शिक्षकांच्या बदलीसाठी शिक्षण विभागाकडे मनपा पदाधिकारी व नगरसेवकांच्या शिफारशींचा अक्षरश: पाऊस पडला होता. तसेच चालू शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी बदलीसाठी दबावतंत्राचा वापर सुुरू केला होता. त्यामुळे ज्या शिक्षकांच्या नियुक्तीला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला, त्यांची प्रशासन व शिक्षण विभागाने बदली केल्याची माहिती आहे.
बदलीसाठी आग्रही; सुधारणा नाही!
सोयीच्या शाळेवर बदली व्हावी, याकरिता अनेक शिक्षक सतत धडपडत असतात. गोरगरीब विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया शिक्षणात सुधारणा व्हावी, त्यांना सर्व सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी कोणतेही शिक्षक किंवा त्यांच्या दुकानदार संघटनांनी जाहिररीत्या प्रयत्न केल्याचे ऐकीवात नाही. मनपा मराठी मुलांची शाळा क्र. २६, मराठी मुलांची शाळा क्र. ७ यासह काही बोटांवर मोजता येणाºया उर्दू शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्नरत असल्याचे दिसून येते.
दोन वर्षांचा कार्यकाळ; तरीही बदली
शिक्षण विभागाने उपायुक्त विजयकुमार म्हसाळ आणि उपायुक्त प्रमोद कापडे यांच्यामार्फत बदली प्रक्रियेला मंजुरी मिळविली. दोन्ही उपायुक्तांकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात जेमतेम दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या शिक्षकांचाही समावेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पदाधिकारी, नगरसेवकांच्या शिफारशींना झुकते माप
मर्जीतल्या शिक्षकांच्या बदलीसाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे २८ पेक्षा जास्त नगरसेवक ांनी पत्रव्यवहार केल्याची माहिती आहे. यातील काही पदाधिकारी व प्रभावी नगरसेवकांच्या शिफारशींना झुकते माप देण्यात आल्याचे बोलल्या जात आहे.