मनपा वाऱ्यावर; १९ दिवसांपासून आयुक्त फिरकलेच नाहीत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:14 AM2021-01-10T04:14:13+5:302021-01-10T04:14:13+5:30
मागील तीन वर्षांच्या कालावधीत महापालिकेच्या विविध विभागांतील घाेटाळे चव्हाट्यावर आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने सिमेंट रस्त्यांचा समावेश असून, अवघ्या सहा ...
मागील तीन वर्षांच्या कालावधीत महापालिकेच्या विविध विभागांतील घाेटाळे चव्हाट्यावर आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने सिमेंट रस्त्यांचा समावेश असून, अवघ्या सहा महिन्यांतच शहरातील सिमेंट रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तीककुमार पांडेय यांच्याकडे सादर झालेल्या साेशल ऑडिटच्या अहवालात सहा सिमेंट रस्त्यांची कामे अतिशय निकृष्ट व दर्जाहिन असल्याचे नमूद करण्यात आले हाेते. अहवालानुसार संबंधित ठेकेदार, बांधकाम विभागातील अभियंत्यांच्या विराेधात कारवाई करण्याचे निर्देश आस्तीककुमार पांडेय यांनी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांना दिले हाेते. आयुक्त कापडणीस यांनी कारवाई न करता सखाेल चाैकशी व तपासणीसाठी नागपूर येथील ‘व्हीएनआयटी’ची नियुक्ती केली. मागील दाेन वर्षांपासून अद्यापही या प्रकरणी आयुक्तांनी कारवाईसाठी हालचाली केल्या नसल्याचे समाेर आले आहे. ‘स्वच्छ भारत’अभियानअंतर्गत कागदाेपत्री बांधण्यात आलेल्या शाैचालयांप्रकरणी प्रशासनाने २९ काेटींची देयके अदा केली आहेत. याप्रकरणी उपायुक्त वैभव आवारे यांना चाैकशी करण्याचे निर्देश आयुक्त कापडणीस यांनी २०१९ मध्ये दिले हाेते. अद्यापही याप्रकरणी कारवाई झाली नाही, हे विशेष. यांसह सायकल खरेदी घाेळ, विद्यार्थिनींना हायजिन किट वाटप प्रकरणात चाैकशी अहवाल प्राप्त झाल्यावरही आयुक्तांनी दाेषींवर कारवाई केली नाही.
बदलीचे वेध लागताच मनपाकडे पाठ
मनपातील नियमबाह्य कामकाज व विविध घाेटाळ्यांत आयुक्त संजय कापडणीस कारवाई करीत नसल्याचे पाहून शिवसेनेने राज्य शासनाकडे तक्रार केली आहे. प्राप्त तक्रारीची शासनाने गंभीर दखल घेत आयुक्तांच्या उचलबांगडीचे संकेत दिले आहेत. बदली हाेण्याचे वेध लागताच आयुक्तांनी मनपाकडे पाठ फिरवल्याचे समाेर आले आहे.
उपायुक्तांवर दाराेमदार
मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी मनपाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रशासकीय कारभाराची सर्व दाराेमदार प्रभारी उपायुक्त वैभव आवारे यांच्या खांद्यावर आली आहे. दैनंदिन कामकाज निकाली काढताना आवारे यांची कसरत हाेत असली तरी ते नेटाने जबाबदारी पार पाडत असल्याचे दिसून येत आहे.