घर बांधकामांना मंजुरी देण्यासाठी महापालिकेचे शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 01:57 PM2019-02-12T13:57:00+5:302019-02-12T13:57:11+5:30
हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करताना नागरिकांच्या नाकीनऊ येत असल्याचे पाहून महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी १४ फेब्रुवारी रोजी मनपाच्या मुख्य सभागृहात शिबिराचे आयोजन केले आहे
अकोला: घराचा नकाशा मंजूर होण्यासाठी सर्वसामान्यांना महापालिकेच्या नगररचना विभागाचे उंबरठे झिजवावे लागतात. हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करताना नागरिकांच्या नाकीनऊ येत असल्याचे पाहून महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी १४ फेब्रुवारी रोजी मनपाच्या मुख्य सभागृहात शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात घर बांधकामांच्या नकाशामधील त्रुटी दूर करून तातडीने परवानगी दिली जाणार असल्याची माहिती सोमवारी आयुक्त संजय कापडणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कमर्शियल कॉम्प्लेक्स, रहिवासी अपार्टमेंटसह घर बांधकामासाठी मनपाच्या नगररचना विभागाची परवानगी आवश्यक आहे. मोठ्या इमारतींचे नकाशे मंजूर करताना अनेकदा त्रुटी निघतात. यादरम्यान, घरांच्या नकाशा मंजुरीसाठीसुद्धा सर्वसामान्य अकोलेकरांना मनपाचा उंबरठा झिजवावा लागतो. आजमितीला नगररचना विभागामध्ये १४० ते १५० बांधकाम नकाशे मंजुरीसाठी प्रस्तावित आहेत. संबंधित मालमत्ताधारकांनी त्रुटी पूर्ण केल्यावरही परवानगीला विलंब होत असल्याचे समोर आल्याची माहिती महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी दिली. यासंदर्भात अनेकदा नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होतात. या सर्व बाबी लक्षात घेता सर्वसामान्य नागरिकांना तातडीने परवानगी मिळावी, या उद्देशातून १४ फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या मुख्य सभागृहात नगररचना विभागाच्यावतीने शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयुक्त कापडणीस यांनी दिली. या शिबिरात मालमत्ताधारकांनी सादर केलेल्या नकाशामध्ये काही त्रुटी निघाल्यास संबंधितांना एक आठवड्याचा कालावधी दिला जाईल. या कालावधीत त्रुटी दूर केल्यास पुन्हा २२ फेब्रुवारी रोजी आयोजित शिबिरात बांधकाम मंजुरी दिली जाईल. मनपाच्या या उपक्रमाचा सर्वसामान्य अकोलेकरांनी लाभ घेण्याचे आवाहन आयुक्त संजय कापडणीस यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला नगररचनाकार संजय पवार, सहायक नगररचनाकार संदीप गावंडे आदी उपस्थित होते.
रात्री उशिरापर्यंत चालेल कामकाज!
सर्वसामान्यांना सोयीचे व्हावे म्हणून मनपाच्या मुख्य सभागृहात सकाळी ११ वाजता शिबिराला प्रारंभ होईल. यावेळी नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करून बांधकाम परवानगी दिली जाईल. सदर कामकाज रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहू शकते, अशी माहिती आयुक्त कापडणीस यांनी दिली. या शिबिरात कमर्शियल कॉम्प्लेक्स किंवा रहिवासी अपार्टमेंटच्या नकाशांना परवानगी दिली जाणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.