महापालिकेचे मार्केटला ‘फटाके’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 02:08 AM2017-10-18T02:08:02+5:302017-10-18T02:09:10+5:30
अकोला : ऐन धनत्रयोदशीच्या दिवशी महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत ‘एसीसी’ मैदानावरील फटाका मार्केटला परवानगी नाकारली. अग्निरोधक उपाययोजनांची पूर्तता न केल्याच्या सबबीखाली वीज पुरवठाही खंडित केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ऐन धनत्रयोदशीच्या दिवशी महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत ‘एसीसी’ मैदानावरील फटाका मार्केटला परवानगी नाकारली. अग्निरोधक उपाययोजनांची पूर्तता न केल्याच्या सबबीखाली वीज पुरवठाही खंडित केला. या प्रकाराची माहिती मिळताच आ. गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर तसेच मनपा पदाधिकार्यांनी फटाका मार्केटमध्ये धाव घेऊन तोडगा काढला. दिवाळी दोन दिवसांवर असताना मनपाच्या आततायी कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये रोष पसरला आहे.
अकोला क्रिकेट क्लब (एसीसी) मैदानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही फटाके विक्रीचा बाजार सजला. कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून संबंधित व्यावसायिकांकडून रीतसर परवानगी घेतली जाते. मैदानावर उभारल्या जाणार्या दुकानांमध्ये ठरावीक अंतर असावे, प्रत्येक दुकानात अग्निरोधक उपाययोजनांची पूर्तता करावी, रेतीने भरलेल्या बादल्या असाव्यात, यांसह विविध नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. अर्थात, या सर्व निकषांचे पालन केल्यानंतरच महावितरण कंपनीकडून विद्युत मीटरची परवानगी दिली जाते. फटाका विक्रेत्यांनी दोन दुकानांमध्ये अंतर न सोडताच, शिवाय अग्निरोधक उपाययोजनांची पूर्तता न केल्याच्या सबबीखाली मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपक पाटील, अग्निशमन अधिकारी रमेश ठाकरे यांनी ऐन धनत्रयोदशीच्या दिवशी फटाके विक्रेत्यांना फटाके लावले. दुकानांना दिलेली परवानगी रद्द करीत वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश महावितरणला दिले. मनपाच्या निर्देशानुसार वीज कंपनीने विद्युत पुरवठा खंडित करताच फटाका असोसिएशन आणि ग्राहकांची धावपळ उडाली. या प्रकाराची माहिती मिळताच आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष किशोर पाटील, स्थायी समिती सभापती बाळ टाले, नगरसेवक अजय शर्मा, विजय इंगळे, गटनेता राहुल देशमुख यांनी मैदानावर धाव घेऊन व्यावसायिकांची बाजू ऐकून घेतली. यावेळी अग्निशमन अधिकारी रमेश ठाकरे, विद्युत विभागाचे उपअभियंता अमोल डोईफोडे यासह मनपा कर्मचारी उपस्थित होते.
अखेर तोडगा काढला!
मनपाच्या निकषांची पूर्तता करणे फटाका व्यावसायिकांनी अपेक्षित आहे; परंतु मनपानेसुद्धा ऐन दिवाळीच्या दोन दिवसांपूर्वी कारवाईचा बडगा उगारणे कितपत योग्य, असा सवाल लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. मैदानावरील ५४ दुकानदारांनी अग्निरोधक उपाययोजनांची पूर्तता करावी आणि प्रशासनाने कारवाई मागे घ्यावी, या मुद्यावर लोकप्रतिनिधींनी यशस्वी शिष्टाई करीत तोडगा काढला.