आजपासून महापालिकेचे कामकाज ‘बंद’
By Admin | Published: January 23, 2015 02:15 AM2015-01-23T02:15:36+5:302015-01-23T02:15:36+5:30
अकोला मनपा कर्मचारी संघर्ष समितीचा शुक्रवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय.
अकोला: सेवानवृत्त तसेच कार्यरत कर्मचार्यांचे वेतन व पाचव्या वेतन आयोगासह सहाव्या वेतन आयोगाची रक्कम अदा करण्यास प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करीत मनपा कर्मचारी संघर्ष समितीने गुरुवारी पुन्हा आंदोलनाचा बिगुल फुंकला. समितीने शुक्रवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मनपातील सेवानवृत्त तसेच कार्यरत कर्मचार्यांचे सहा महिन्यांचे वेतन थकीत असून, जुलै महिन्याची पगारवाढ डिसेंबर महिन्यात लागू केली. पाचव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम, सहाव्या वेतन आयोगाची रक्कम अदा करण्यात आली नाही. प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे मनपा कर्मचारी संघर्ष समितीने डिसेंबर महिन्यात प्रशासनाला आंदोलनाची रीतसर नोटीस दिली. शिवाय मनपा आवारात टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडल्यानंतरही प्रशासनाने चर्चा न केल्याने कर्मचार्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यामुळे २३ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्याचा निर्णय संघर्ष समितीच्यावतीने अध्यक्ष पी.बी. भातकुले, उपाध्यक्ष अनुप खरारे, शांताराम निंधाने, कैलास पुंडे, अनिल बिडवे, विठ्ठल देवकते, विजय पारतवार, विजय सारवान, प्रताप झांझोटे, गुरू सारवान यांनी घेतला आहे. मनपा कर्मचारी संघर्ष समितीचे अध्यक्ष पी.बी.भातकुले यांनी मनपाच्या तिजोरीत ११ कोटी पडून आहेत. तरीही वेतन दिले जात नसल्यबद्दल रोष व्यक्त केला. कर्मचार्यांचे वेतन थकीत असताना प्रशासकीय अधिकारी सत्काराची हौस भागवतात, हे दुर्दैवी आहे. संघर्ष समितीसोबत वरिष्ठ अधिकारी व पदाधिकार्यांनी कधीही चर्चा केली नाही. यामुळे नाईलाजाने संपावर जावे लागत आहे. अधिकारी मनमानी करीत असून, अंदाधुंद कारभार सुरू आहे. सेवानवृत्त कर्मचार्यांची परिस्थिती फार दयनीय आहे. उद्यापासून काम बंद आंदोलन सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
*कामकाज कोलमडणार
मनपा कर्मचारी संघर्ष समितीने बेमुदत काम बंद करण्याचा निर्णय घेतल्याने उद्यापासून मनपाचे प्रशासकीय कामकाज ठप्प पडणार आहे. याचा परिणाम मूलभूत सुविधांवर होईल, हे निश्चित आहे. आंदोलनात सेवानवृत्त कर्मचारीसुद्धा सहभागी होणार आहेत.
*शिक्षकही लागले तयारीला
मनपा शिक्षकांचेदेखील सहा महिन्यांचे वेतन थकीत आहे. आयुक्त रुजू झाल्यानंतर वेतनाचा प्रश्न मार्गी लागेल या अपेक्षेने शिक्षकांनी आंदोलन स्थगित केले होते. आयुक्तांच्या बदलीमुळे आता शिक्षकदेखील आंदोलनाच्या तयारीत आहेत. -