‘पीए’ ने स्वीकारली लाच; अकोला मनपा उपायुक्त सोळंकेना अटक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 11:33 PM2017-11-15T23:33:56+5:302017-11-16T00:00:21+5:30
बिअर शॉपी सुरू करण्यासाठी मनपाच्या शॉप अँक्टचा परवाना घेणे बंधनकारक आहे. हा परवाना देण्यासाठी महापालिकेचे उपायुक्त समाधान चांगो सोळंके यांनी त्यांच्या स्वीय सहायकामार्फत बुधवारी रात्री ८.३0 एका हॉटेलवर २0 हजार रुपयांची लाच स्वीकारली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बिअर शॉपी सुरू करण्यासाठी मनपाच्या शॉप अँक्टचा परवाना घेणे बंधनकारक आहे. हा परवाना देण्यासाठी अकोला महापालिकेचे उपायुक्त समाधान चांगो सोळंके यांनी त्यांच्या स्वीय सहायकामार्फत बुधवारी रात्री ८.३0 एका हॉटेलवर २0 हजार रुपयांची लाच स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्वीय सहायक राजेश रामदास जाधव याला अटक केल्यानंतर उपायुक्त समाधान सोळंके यांना त्यांच्या घरातून अटक केली. मनपाचे आयुक्त अजय लहाने यांची बदली होताच, मनपा प्रशासनावर बालंट आले, हे विशेष.
शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाने बिअर शॉपी सुरू करण्यासाठी मनपाकडे शॉप अँक्ट परवाना मिळावा, यासाठी अर्ज केला होता. या हॉटेल व्यावसायिकाला शॉप अँक्ट परवाना देण्यासाठी मनपाचे उपायुक्त समाधान सोळंके यांनी त्याच्याकडे २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली; परंतु २५ हजार रु पयांऐवजी २0 हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली. दोघांमध्ये २0 हजार रु पयांमध्ये तडजोड झाली. दरम्यान, हॉटेल व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. बुधवारी २0 हजार रुपये हॉटेलवरून घेऊन जाण्यास व्यावसायिकाने उपायुक्त सोळंके यांना सांगितले. त्यामुळे सोळंके यांनी त्यांचा स्वीय सहायक राजेश जाधव याला हॉटेलवर पैसे घेण्यास पाठविले. जाधव हा पैसे घेण्यास गेला आणि त्याने हॉटेल व्यावसायिकाच्या मुलाकडून २0 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच हॉटेलजवळच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी जाधव याला रंगेहात पकडले आणि त्याला अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी उपायुक्त सोळंके यांच्या राम नगर म्हाडा कॉलनीतील घरी जाऊन त्यांना अटक केली. सोळंके यांच्या घरातून हॉटेल व्यावसायिकाचे कागदपत्रेसुद्धा एसीबीच्या अधिकार्यांनी जप्त केल्याची माहिती एसीबीचे पोलीस उपअधीक्षक संजय गोर्ले यांनी सांगितले.
जाधव ने जेवण केल्यानंतर आणखी केली दोन हजारांची मागणी
उपायुक्त समाधान सोळंके यांच्या सांगण्यावरून त्यांचा स्वीय सहायक राजेश जाधव हा हॉटेलवर गेला. त्याने प्रारंभी तेथे यथेच्छ भोजन केले. त्यानंतर जाधवने २0 हजार रुपयांची रक्कम स्वीकारली आणि वरून हॉटेल व्यावसायिकाकडे स्व त:च्या खर्चपाण्यासाठी दोन हजार रुपयेसुद्धा मागितले.