मनपा कर्मचा-यांची दिवाळी गोड
By admin | Published: October 30, 2016 03:24 AM2016-10-30T03:24:21+5:302016-10-30T03:24:21+5:30
परतफेडीच्या अटीवर शासनाने दिले ९ कोटी २६ लाख रुपये.
अकोला, दि. २९- दिवाळीच्या पूर्वसंध्येला एक महिन्याचे वेतन अदा करीत प्रशासनाने महापालिका कर्मचार्यांना सुखद धक्का दिला. राज्य शासनाने परतफेडीच्या अटीवर बँकेमध्ये व्याजाच्या बदल्यात जमा ९ कोटी २६ लाख रुपयांना मंजुरी देत कर्मचार्यांची दिवाळी गोड केली. मनपात शनिवारी सायंकाळी हक्काचे वेतन मिळवण्यासाठी कर्मचार्यांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले.
ऐन दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसांत मनपा कर्मचार्यांचे चार महिन्यांचे वेतन रखडले होते. मनपाला विकास कामांसाठी शासनाकडून प्राप्त कोट्यवधींच्या रकमेच्या बदल्यात बँकांमध्ये व्याजापोटी जमा ९ कोटी २६ लाख रुपये मंजूर करण्याची मागणी मनपा आयुक्त अजय लहाने यांनी नगर विकास विभागाकडे लावून धरली होती. पावसाळी अधिवेशनात आमदार गोवर्धन शर्मा, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. रणधीर सावरकर यांनी शासनाकडे बँकांमध्ये जमा रक्कम मनपाला मंजूर करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तेव्हापासून ही रक्कम मिळणार, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. लोकप्रतिनिधींचा व मनपा आयुक्तांचा पाठपुरावा कामी आला अन् अंतिम क्षणी का होईना, २८ ऑक्टोबर रोजी शासनाने परतफेडीच्या अटी-शर्ती ठेवून ९ कोटी २६ लाखांची रक्कम मंजूर
केली.
जुलै महिन्याचे वेतन मिळाले
मनपाचे सेवानवृत्त तसेच कार्यरत कर्मचार्यांचे जुलै महिन्यांपासून पेन्शन-वेतन थकीत होते. दिवाळी एक दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे वेतन मिळण्याची आशा धुसर झाली होती. उशिरा का होईना, दिवाळीच्या पूर्वसंध्येला कर्मचारी व शिक्षकांचे एक महिन्याचे वेतन अदा झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
जानेवारी २0१८ पर्यंत मुदत
मालमत्ता पुनर्मूल्यांकनाच्या बळावर ९ कोटी २६ लाख रुपये परत करण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. १ मे २0१७ नंतर प्रतिमहिना १ कोटी रुपये यानुसार जानेवारी २0१८ पर्यंत ही रक्कम परत करण्यासाठी शासनाने मुदत दिली आहे. अन्यथा एलबीटीच्या अनुदानातून एक कोटी रुपये वळती केले.