अतिक्रमीत ८७ दुकाने हटविण्यासाठी मनपाचा ताफा धडकला, व्यावसायिकांची धावपळ
By आशीष गावंडे | Published: November 4, 2022 06:40 PM2022-11-04T18:40:10+5:302022-11-04T18:40:23+5:30
अकोला येथील ८७ दुकाने हटविण्यासाठी मनपाचा ताफा धडकला आहे.
अकोला : अकोला शहरातील जुना धान्य बाजारात महसूल विभागाच्या मालकीच्या जागेवर अनधिकृतरित्या उभारण्यात आलेली ८७ दुकाने हटविण्यासाठी शुक्रवारी महापालिकेचा ताफा धडकला. व्यावसायिकांना पूर्व सूचना न देताच कारवाइला प्रारंभ होणार असल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. अखेर ठाकरे गटातील शिवसेना व कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मनपा प्रशासनाची समजूत काढल्यानंतर कारवाइला तात्पुरता ‘ब्रेक’लावण्यात आल्याचे दिसून आले.
शहराच्या मध्यभागी जुना धान्य बाजारात महसूल विभागाच्या जागेवर दैनंदिन व्यवसाय करण्यासाठी लघु व्यावसायिकांना परवानगी देण्यात आली होती. मागील अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडणाऱ्या लघु व्यावसायिकांनी जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाला ठेंगा दाखवत पक्की व टिनाची दुकाने उभारली. याप्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाप्रशासनाने मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांना अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुषंगाने शुक्रवारी उत्तर झोनचे क्षेत्रीय अधिकारी, नगररचना विभाग व अतिक्रमण विभागाचा ताफा याठिकाणी दाखल होताच संबंधित व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली. कारवाइला प्रारंभ होताच शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा, कॉंग्रेसचे पदाधिकारी साजीद खान पठाण यांनी घटनास्थळावर धाव घेत प्रशासनाकडे अतिक्रमकांना दुकानांमधील साहित्य काढून घेण्यासाठी मुदत देण्याची मागणी केली. काही दुकानांमधील मौल्यवान वस्तू लक्षात घेता प्रशासनाने व्यावसायिकांना सात दिवसांची मुदत देत कारवाइला तात्पुरता विराम दिला. अनूचित प्रकार टाळण्यासाठी यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.