कोरोना 'पॉझिटिव्ह' रुग्णांकडे महापालिकेच्या वैद्यकीय यंत्रणेची पाठ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 11:41 AM2020-09-29T11:41:18+5:302020-09-29T11:41:27+5:30
खुद्द मनपा आयुक्त संजय कापडणीस यांना अंधारात ठेवल्या जात असल्याची माहिती आहे.
अकोला: महापालिका क्षेत्रात कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांशी संपर्क साधून त्यांना रुग्णालयात भरती करण्याची जबाबदारी असलेल्या मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने पॉझिटिव्ह रुग्णांकडे सपशेल पाठ फिरविल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरही वैद्यकीय यंत्रणेकडून रुग्णांची दखल घेतली जात नसून, याप्रकरणी खुद्द मनपा आयुक्त संजय कापडणीस यांना अंधारात ठेवल्या जात असल्याची माहिती आहे.
महापालिका क्षेत्रात मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असताना मनपाची वैद्यकीय आरोग्य यंत्रणा सपशेल कुचकामी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या सोबत संपर्क साधणे तसेच घरी जाऊन कुटुंबीयांची व 'हायरिस्क' मधील नागरिकांची आरोग्य तपासणी करून संबंधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची जबाबदारी वैद्यकीय यंत्रणेकडे सोपविण्यात आली आहे. मागील काही दिवसांपूर्वी मनपा आयुक्तांनी क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडे दिलेली जबाबदारी काढून घेत वैद्यकीय आरोग्य यंत्रणेकडे सोपवण्याचा निर्णय घेतला होता. आयुक्तांच्या निर्णयाला सार्थ ठरविणे अपेक्षित असताना या विभागाकडून प्रशासनाची सातत्याने दिशाभूल केली जात असल्याचे समोर आले आहे. शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरही संबंधित रुग्णाला अवगत केले जात नसल्याची धक्कादायक माहिती आहे. आज रोजी मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेची जबाबदारी प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.फारुख शेख यांच्याकडे सोपवली असून, त्यांच्या अधिनस्त असलेले वैद्यकीय अधिकारी व परिचारिका कोरोनाचा मुकाबला करण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.
क्षेत्रिय अधिकारी ठरले होते सरस!
शहरात एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर आयुक्त संजय कापडणीस यांनी कोरोना बाधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करणे, घरामध्ये निर्जंतुकीकरण करणे व संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्याची जबाबदारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर सोपवली होती. क्षेत्रिय अधिकाºयांच्या दिमतीला शिक्षक, आशा स्वयंसेविका तसेच टॅक्स विभागातील वसुली निरीक्षक होते. आयुक्तांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यात वैद्यकीय यंत्रणेपेक्षा क्षेत्रीय अधिकारी सरस ठरले होते, हे विशेष.
आरोग्य यंत्रणेच्या दिव्याखाली अंधार!
मनपाचे काही वैद्यकीय आरोग्य अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयात बसून कोरोनाला आळा घालण्याच्या रूपरेषेत व्यस्त असल्याची चर्चा आहे. शहरातील दहा नागरी आरोग्य केंद्रांवर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची जबाबदारी सोपवून हात झटकण्याचा प्रयत्न पाहता प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख यांनी लक्ष देण्याची गरज आहे.