कंटेन्मेट झाेन तयार करण्यासाठी महापालिकेची धावाधाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:18 AM2021-04-11T04:18:27+5:302021-04-11T04:18:27+5:30
संसर्गजन्य काेराेनामुळे नागरिकांचा मृत्यू हाेत असला तरीही अकाेलेकरांना या साथराेगाचे कवडीचेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. काेराेनाबाधित रुग्णांचा आकडा ...
संसर्गजन्य काेराेनामुळे नागरिकांचा मृत्यू हाेत असला तरीही अकाेलेकरांना या साथराेगाचे कवडीचेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. काेराेनाबाधित रुग्णांचा आकडा सतत वाढत चालला आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी साेमवारी द्विसदस्यीय केंद्रीय पथक अकोल्यात दाखल होणार आहे. यादरम्यान पथकाकडून काेराेनाचे हाॅटस्पाॅट ठरलेल्या भागातील कंटेन्मेट झाेनची पाहणी केली जाण्याची शक्यता आहे. यावेळी मनपा प्रशासनाने काेराेनाला आळा घालण्यासाठी काेणत्या स्वरूपाच्या उपाययाेजना केल्या, याबद्दलचा सविस्तर अहवाल केंद्रीय आराेग्य मंत्रालयाकडे सादर केला जाईल.
माहिती संकलित करताना धांदल
शहरातील काेराेनाबाधित रुग्ण, हायरिस्क रुग्ण व त्यांच्या संपर्कातील इतर व्यक्तींची सविस्तर माहिती मनपाकडे उपलब्ध असणे अपेक्षित आहे. ही माहिती वैद्यकीय यंत्रणा, तसेच क्षेत्रीय कार्यालयात उपलब्ध नसल्याने आता ऐनवेळेवर ही माहिती संकलित करताना यंत्रणेची धांदल उडाली आहे.
अकाेलेकर बेफिकीर; मनपा सुस्त
काेराेनामुळे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या जिवाला धाेका निर्माण हाेऊ शकताे, याची जाणीव असतानाही नागरिक, युवा वर्गाकडून नियमांचे पालन केले जात नसल्याची परिस्थिती आहे. अशा नागरिकांवर कठाेर कारवाईची गरज असताना मनपाची यंत्रणा सुस्तावल्याची परिस्थिती आहे. जनजागृती करण्यात प्रशासन कुचकामी ठरल्याचे दिसत आहे.
आता वेळेवर घरांवर लाल चिन्ह!
वैद्यकीय यंत्रणेवर ताण येत असल्यामुळे काेराेनाची लक्षणे आढळून येणाऱ्या, तसेच हायरिस्कमधील रुग्णांना हाेम क्वारंटाइनसाठी मनपाने परवानगी दिली आहे. अशा नागरिकांची ओळख पटावी यासाठी संबंधित रुग्णांच्या घरावर लाल रंगाचे गुणाकार चिन्ह लावण्याचे निर्देश मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी वैद्यकीय यंत्रणा व झाेन कार्यालयांना १६ मार्च राेजी दिले हाेते. केंद्रीय पथकाच्या धास्तीने ८ एप्रिलपासून बाधित रुग्णांच्या घरावर लाल रंगाचे चिन्ह लावले जात आहे.
सामान्य रुग्णालयाची पाहणी
केंद्रीय पथकाकडून जिल्हा सामान्य रुग्णालयातील काेराेनाबाधित रुग्णांचे वाॅर्ड, त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती घेतली जाणार आहे. रुग्णालयाने खाटांची तसेच व्हेंटिलेटर खाटांची संख्या वाढवणे अपेक्षित असताना तसे हाेत नसल्यामुळे रुग्णांचे हाल हाेत आहेत.