मनपाच्या शाळा इमारती शिकस्त; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 01:06 PM2018-07-11T13:06:52+5:302018-07-11T13:11:55+5:30
अकोला: महापालिकेच्या एकूण ३३ शाळांपैकी सुमारे दहा शाळेच्या इमारती अत्यंत शिकस्त असल्याची बाब तांत्रिक अहवालात समोर आल्याने गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
अकोला: महापालिकेच्या एकूण ३३ शाळांपैकी सुमारे दहा शाळेच्या इमारती अत्यंत शिकस्त असल्याची बाब तांत्रिक अहवालात समोर आल्याने गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. भविष्यातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी संबंधित शिकस्त इमारतींच्या दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाने तडकाफडकी निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहरात महापालिकेच्या ३३ शाळा असून यामध्ये मराठी, हिंदी व उर्दू माध्यमाचा समावेश आहे. बहुतांश शाळांमध्ये मूलभूत सुविधांची बोंब असून, सुविधा निर्माण करण्यासाठी मनपाकडे निधीची कमतरता नसल्याची परिस्थिती आहे; परंतु या विषयाकडे सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षातील नगरसेवकांप्रमाणेच खुद्द प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याचे केविलवाणे चित्र आहे. मनपा शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांची पूर्तता होते किंवा नाही, याची तपासणी करण्याचे काम शिक्षणाधिकाºयांचे आहे. शाळेत मुला-मुलींसाठी शौचालय, वर्गात पंखे, लाईट, बसण्यासाठी बेंच तसेच पिण्यासाठी शुद्ध पाणी, खेळासाठी मैदान, क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे शिक्षण विभागाची नैतिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी आपण किती प्रामाणिकपणे निभावतो, यावर शिक्षण विभागाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. केवळ बदल्यांमध्ये ‘इन्टरेस्ट’ठेवणाºया शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे आज रोजी ३३ शाळांपैकी १० शाळांमधील इमारती अत्यंत शिकस्त असल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे.
निधी आहे तर बांधकाम का नाही?
मनपाच्या दहा शाळांमधील शिकस्त झालेल्या इमारती कोणत्याही क्षणी कोसळू शकतात. अशा वेळी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज रोजी मनपाकडे कोट्यवधींचा निधी असल्याचा गवगवा सत्ताधारी पक्षाकडून केला जातो. निधी उपलब्ध असताना नवीन इमारतीचे बांधकाम का केले जात नाही,असा सवाल उपस्थित होतो.
वर्ग खोल्यांमध्ये पावसाचे पाणी!
जुने शहरातील मनपाच्या मराठी मुलांची शाळा क्रमांक १ मधील वर्ग खोल्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे. पावसाचे पाणी थेट छतावरून वर्ग खोल्यांमध्ये शिरल्याचे चित्र समोर आले आहे. मैदानात पाणी साचले असून, चिखलातून वाट तुडवित विद्यार्थ्यांना वर्ग खोल्यात जावे लागत आहे. शिकस्त खोल्या दुरुस्तीच्या संदर्भात संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे, हे येथे उल्लेखनीय.
मनपाच्या दहा शाळांमधील इमारती शिकस्त असून, कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सत्ताधारी व प्रशासन पुढाकार घेत नसल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात सापडला आहे. शिकस्त इमारती पाडून नवीन इमारती तयार करण्यासाठी प्रशासनाला पत्र दिले आहे. प्रशासनाने वेळीच पाऊले न उचलल्यास सर्वांना गंभीर परिणाम भोगावे लागतील.
-साजीद खान पठाण, विरोधी पक्षनेता, मनपा.