मनपा शाळा विद्यार्थ्यांसाठी मेजवानी; क्रीडा स्पर्धांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 12:14 PM2020-02-01T12:14:08+5:302020-02-01T12:14:12+5:30
महापालिकेने स्थानिक वसंत देसाई क्रीडांगण येथे ५ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत क्रीडा स्पर्धेचे तसेच १० फेब्रुवारी रोजी प्रमिलाताई ओक सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: गत अनेक वर्षांपासून रखडलेल्या महापालिकेच्या शालेय क्रीडा स्पर्धांचे यंदा आयोजन केले जाणार असून, ही शालेय विद्यार्थ्यांसाठी मेजवानी ठरणार आहे. महापालिकेने स्थानिक वसंत देसाई क्रीडांगण येथे ५ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत क्रीडा स्पर्धेचे तसेच १० फेब्रुवारी रोजी प्रमिलाताई ओक सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्येही उत्साहाचे वातावरण असल्याचे बोलल्या जात आहे.
महापालिकेच्या शिक्षण विभागाला दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे शक्य असले तरी नियोजनाचा अभाव आणि उदासीनतेमुळे क्रीडा स्पर्धांना बगल दिली जाते. त्या तुलनेत खासगी शाळांमध्ये प्रत्येक वर्षी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू असल्याचे दिसून येते. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात संधी मिळावी, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशातून उशिरा का होईना, यंदा महापालिकेने शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे.
स्थानिक वसंत देसाई स्टेडियम येथे ५ ते ८ फेब्रुवारी या दरम्यान विविध स्पर्धा पार पडतील. यामध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी ५० मीटर धावण्याची शर्यत, दोरीवरील उड्या, बटाटा स्पर्धा, लंगडी, लिंबू चमचा स्पर्धा, इयत्ता ५ ते ६ मधील विद्यार्थ्यांसाठी कबड्डी, रस्सीखेच, १०० मीटर धावणे, लंगडी, तीन पायांची शर्यत, पोत्याची शर्यत तसेच लांब उडी आणि इयत्ता ७ ते ८ मधील विद्यार्थ्यांसाठी कबड्डी, खो-खो, रस्सीखेच, फुटबॉल, व्हॉलीबॉल, १०० मीटर धावणे, २०० मीटर धावणे, लांब उडी, गोळाफेक, थाळीफेक आदी क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.
१० फेब्रुवारीला सांस्कृतिक कार्यक्रम
मनपाच्यावतीने प्रमिलाताई ओक सभागृहात सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गायन, समूह नृत्य, समूहगान, नाटिका, एकपात्री प्रयोग आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.
शिक्षकांसाठीही स्पर्धा
शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबतच प्रशासनाने मराठी, हिंदी व उर्दू माध्यमातील शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांसाठीही विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. शिक्षकांसाठी क्रिकेट, व्हॉलीबॉल तसेच शिक्षिकांसाठी रांगोळी स्पर्धा, पूजा थाली सजावट स्पर्धेचा समावेश आहे.