तेल्हार नगर परिषदेच्या नगरसेविका अपात्र
By admin | Published: January 22, 2015 02:03 AM2015-01-22T02:03:25+5:302015-01-22T02:03:25+5:30
शासकीय जागेवरील अतिक्रमण भोवले.
तेल्हारा (जि. अकोला): स्थानिक नगर परिषदेच्या सत्तारुढ भाजप गटाच्या प्रभाग क्र. चारच्या नगरसेविका अरुणा पांडुरंग पवार यांना शासकीय जागेवर अतिक्रमण करणे चांगलेच महागात पडले आहे. त्यांच्या या कृतीसाठी जिल्हाधिकारी अकोला यांच्या न्यायालयाने त्यांना नगरसेविका म्हणून अपात्र ठरविल्याने तेल्हारा शहरात खळबळ उडाली आहे. अरुणा पांडुरंग पवार यांनी तेल्हार नगर परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर तेल्हारा-जळगाव जामोद या रस्त्याला लागून असलेल्या शासकीय जागेवर पक्के बांधकाम केले आहे. त्यांच्या या कृतीसाठी त्यांना अपात्र घोषित करावे, यासाठी येथील भगवान लालचंद सोनोने यांनी जिल्हाधिकारी अकोला यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर १६ जानेवारी रोजी अरुणा पवार यांना नगर परिषदेच्या सदस्य पदावरून अपात्र घोषित करण्याचा आदेश दिला. सोनोने यांच्यावतीने अँड. अभय थोरात व अँड. मनीष खरात यांनी बाजू मांडली.