ग्रामपंचायतींचे दस्तावेज ताब्यात घेण्यासाठी पालिका सरसावली
By admin | Published: September 2, 2016 02:06 AM2016-09-02T02:06:07+5:302016-09-02T02:06:07+5:30
पथकांचे गठन: पाच ग्रामपंचायतींमधील दस्तावेजांची केली तपासणी.
अकोला, दि. १: महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायतींमधील दस्तावेज ताब्यात घेण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले. उपायुक्त सुरेश सोळसे यांच्या मार्गदर्शनाखाली गठित करण्यात आलेल्या विविध पथकांनी गुरुवारी पाच ग्रामपंचायतींमधील दस्तावेजाची तपासणी केली. सदर दस्तावेज शुक्रवारपासून ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे.
महापालिकेच्या हद्दवाढीत शहरालगतच्या २४ गावांचा समावेश झाला आहे. हद्दवाढीची प्रक्रिया आटोपल्यानंतर आता संबंधित ग्रामपंचायतींमधील प्रशासकीय दस्तावेज ताब्यात घेण्याला सुरुवात होणार आहे. यामध्ये २४ गावांमधील ग्रामपंचायतीची इमारत, जिल्हा परिषदेच्या इमारती, निर्माणाधीन बांधकामांपासून ते कार्यरत कर्मचार्यांच्या समायोजनासह विविध विभागाच्या दस्तावेजांचा समावेश राहील. अतिशय गुंतागुंतीची ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महापालिका व जिल्हा परिषद प्रशासनाने हस्तांतरणाची प्रक्रिया सुटसुटीत व्हावी, याकरिता अधिकार्यांच्या संयुक्तिक पथकाचे गठन करण्याचा निर्णय घेतला.
महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी ही जबाबदारी उपायुक्त सुरेश सोळसे यांच्याकडे सोपवली. यादरम्यान, ग्रामपंचायतींमध्ये पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभाग, आरोग्य, जन्म-मृत्यू दाखला विभागासह इतर अनेक मुद्यांची माहिती व दस्तावेज ताब्यात घेण्यासाठी मनपाच्या स्तरावर अधिकारी-कर्मचार्यांची पथके निर्माण करण्यात आली. या सर्व पथकांनी गुरुवारी शहरालगतच्या पाच ग्रामपंचायतींमधील दस्तावेजांची तपासणी केली असून शुक्रवारी सदर कागदपत्रे ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे.
या ग्रामपंचायतींची केली तपासणी
मनपा उपायुक्त सुरेश सोळसे, मुख्य लेखाधिकारी बावस्कर यांच्या उपस्थितीत मलकापूर, खडकी, शिवणी, शिवर व उमरी ग्रामपंचायतमधील दस्तावेजांची तपासणी करण्यात आली. यावेळी मनपाच्या जलप्रदाय विभाग, लेखा विभाग, बांधकाम विभाग, नगररचना विभाग, आरोग्य विभागाच्या अधिकारी-कर्मचार्यांनी दस्तावेजांची तपासणी केली.
हद्दवाढ झाल्यावर बैठक!
राज्य शासनाने ३0 ऑगस्ट रोजी हद्दवाढीची अधिसूचना जारी केली. ज्या दिवशी अधिसूचना जारी केली, त्या दिवशी नियमानुसार ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांची पदे रद्द झाली, असे असतानादेखील मलकापूर ग्रामपंचायतच्यावतीने ३१ ऑगस्ट रोजी एक बैठक घेण्यात आल्याची माहिती आहे.
'बॅकडेट'मध्ये पराक्रम नको!
मनपा क्षेत्रात समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायतींमधून दस्तावेज ताब्यात घेण्याची प्रक्रिया येत्या तीन दिवसांत पूर्ण केली जाणार असल्याचा महापालिकेचा दावा आहे. यादरम्यान, संबंधित ग्रामसेवकांनी ह्यबॅकडेटह्णमध्ये कोणतेही पराक्रम करू नयेत. तसे आढळून आल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
-ग्रामपंचायतींमधील सर्व प्रकारचे दस्तावेज ताब्यात घेतल्या जातील. त्यांची पडताळणी केली जाईल. तसा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर केला जाईल.
- अजय लहाने, आयुक्त, मनपा